बांगलादेशी महिलेनेही घेतला लाडकी बहिण योजनेचा लाभ:कागदपत्रे तयार करण्यासाठी मदत करणाऱ्या एजंटलाही अटक
राज्यामध्ये सध्या बांगलादेशी घुसखोरांची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेण्याची विशेष मोहीम महाराष्ट्र पोलिसांच्या वतीने राबवली जात आहे. यातच मुंबईतील कामठीपुरा भागात अटक करण्यात आलेल्या पाच बांगलादेशी नागरिकांमधील एका महिलेने राज्य सरकारच्या लाडकी बहिण योजनेची लाभ घेतला असल्याची धक्कादाय माहिती समोर आली आहे. आता या प्रकरणी या नागरिकांना मदत करणाऱ्या एका एजंटला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी महाराष्ट्र सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या लाडकी बहिण योजना नागरिकांमध्ये विशेष लोकप्रिय झाली असल्याचे पाहायला मिळाले. या योजनेच्या माध्यमातून अनेक महिलांना थेट आर्थिक लाभ देण्यात आला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीतील घटक पक्षांना भरघोस यश मिळाले. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता स्थापन झाली आहे. मात्र आता या लाडक्या बहिण योजनेवरून राज्यात आरोप – प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्यातच आता लाडकी बहिण योजनेचा लाभ बांगलादेश मधील महिलेने देखील घेतल्याचे समोर आले आहे. पोलिसांची विशेष मोहीम याबाबत मिळालेल्या अधिकच्या माहितीनुसार, केंद्र सरकारने दिलेल्या विशेष निर्देशानंतर राज्यातील बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे. पोलिसांची विशेष मोहीम यासाठी राबवली जात आहे. यातच कामठीपुरा भागातून पाच बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले होते. या नागरिकांची चौकशी केली असता यातील एका महिलेने लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतला आहे, हे समोर आले आहे. या बांगलादेशी नागरिकांना स्थानिक पातळीवरूनच कागदपत्रे तयार करण्यासाठी मदत करण्यात आली होती. याच कागदपत्रांच्या माध्यमातून या महिलेने या योजनेचा लाभ घेतला आहे. स्थानिक पातळीवर मदत या बांगलादेशी नागरिकांना येथील कागदपत्रे तयार करण्यासाठी स्थानिक एजंट मदत करत असल्याचे दिसून येत आहे. या पाच बांगलादेशी नागरिकांच्या चौकशीमधून स्थानिक एजंटची माहिती देखील समोर आली होती. आता पोलिसांनी या एजंटला देखील ताब्यात घेतले आहे. त्यानेच बांगलादेशी नागरिकांना सर्व कागदपत्रे तयार करून दिली असल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक पातळीवर मदत मिळाल्यामुळेच हे बांगलादेशी नागरिक राज्यांमध्ये स्थायिक होत आहेत. त्यामुळे आता या सर्व कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.