अंबाजोगाईत अवैध दारू निर्मिती कारखान्यावर धाड:वाल्मीक कराडच्या निकटवर्तीयचा असल्याने कारवाई नाही, अंजली दमानियांचा आरोप
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक्सवर एक व्हिडिओ शेअर केला असून त्यात अंबाजोगाई येथे अवैध दारूचा कारखाना सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. हा कारखाना वाल्मीक कराडच्या निकटवर्तीयचा असल्यामुळे या कारखान्यावर कारवाई न करता आरोपींना मोकाट सोडून देण्यात आले असल्याचे अंजली दमानिया यांनी म्हंटले आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील बूटनाथ तलाव या ठिकाणी एक दारूचा कारखाना होता. ज्यात अवैधरित्या दारू निर्मिती केली जात होती. रंगनाथ जगताप या अधिकाऱ्याने व उत्पादन शुल्क विभागाने सदरील कारखान्यावर कारवाई केली होती पण तो कारखाना वाल्मीक कराडच्या निकटवर्तीयचा असल्यामुळे या कारखान्यावर कसल्याही प्रकारची कारवाई न करता आरोपींना मोकाट सोडून देण्यात आले असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. तसेच याचा तपास तातडीने करावा, अशी विनंती देखील त्यांनी बीड पोलिसांना केली आहे. अधिकची माहिती अशी की अंबाजोगाई येथील बूटनाथ तलाव परिसरात डोंगर भागात हा कारखाना सुरू होता. विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध दारू निर्मिती येथून केली जात होती, मात्र याचा कोणालाच पत्ता कसा लागला नाही, असा सवाल आता उपस्थित होत आहे. उत्पादन शुल्क विभागाला या कारखान्याची माहिती समजताच त्यांनी कारखान्यावर धाड टाकली. यावेळी चार ते पाच जणांना अटक देखील करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले सर्व आरोपी हे धुळे जिल्ह्यातील आहेत. आता मुख्य आरोपीचा शोध घेणे सुरू आहे. दरम्यान, अंजली दमानिया यांनी वेळोवेळी बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीवर भाष्य करत अनेक प्रकरणे उघडकीस आणून देण्याचे काम करत आहेत. तसेच संतोष देशमुख हत्या परकरणतील आरोपी व मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा मानला जाणारा वाल्मीक कराड याच्याविरोधात अंजली दमानिया यांनी अनेक पुरावे देखील माध्यमांसमोर आणून दिले आहेत. आता हा अवैध दारू निर्मितीचा कारखाना देखील वाल्मीक कराडच्या निकटवर्तीयचा असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.