भाजपच्या दबावानंतरही मंत्रिपदाचा राजीनामा न देण्यावर धनंजय मुंडे ठाम:अजित पवारांकडून पाठराखण झाल्याने फडणवीसांसमोर धर्मसंकट
‘माझी नैतिकता ही माझ्या जनतेसोबत आहे. माझ्या नैतिकतेनुसार मी दोषी नाही,’ असा दावा करत राष्ट्रवादीचे नेते तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. दुसरीकडे, भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मात्र धनंजय मुंडे व खंडणीतील आरोपी वाल्मीक कराड यांचे जवळचे संबंध असल्याचे सांगत मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असलेला वाल्मीक कराड खंडणीबरोबरच खून प्रकरणातही संशयित असल्याने सरकारची प्रतिमा डागाळली असल्याने मुंडेंचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी करत भाजपातून दबाव वाढत आहे. पण अजित पवार त्यांची पाठराखण करत असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अडचण झाली आहे. ‘मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री माझा राजीनामा मागू शकतात’ दिल्लीत पत्रकारांशी बाेलताना मुंडे म्हणाले, ‘मला टार्गेट केले जातेय. संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा करा, अशी माझीही मागणी आहे. मात्र या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही, असे पुन्हा सांगतोय. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना मी जर दोषी वाटत असेन तर माझा राजीनामा घेण्याचा त्यांना अधिकार आहे.’