साहित्य अकादमीच्या पुरस्कार प्रक्रियेत बदल:लेखक, प्रकाशकांकडून पहिल्यांदाच मागवली पुस्तके; 28 फेब्रुवारी पर्यंत पाठवता येणार
साहित्य क्षेत्रात देशात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या साहित्य अकादमी पुरस्कार प्रक्रियेत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. आता या वर्षापासून साहित्य अकादमीच्या मुख्य पुरस्कारासाठी लेखक, प्रकाशकांना पुस्तके पाठवावी लागतील. त्याची अंतिम तारीख 28 फेब्रुवारी आहे, अशी माहिती साहित्य अकादमीचे सचिव के. श्रीनिवास यांनी दिली. साहित्य अकादमीने मान्यता दिलेल्या 24 भारतीय भाषांमधील दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात. साहित्य अकादमीच्या या बदलाची अकादमीचे सचिव के. श्रीनिवास राव यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, पुस्तके सादर करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2025 आहे. 2025 च्या पुरस्कारांसाठी, 2019 ते 2023 (1 जानेवारी 2019 ते 31 डिसेंबर 2023) या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकांची एक प्रत अर्ज भरून विचारार्थ पाठवता येईल. त्यांनी पुढे सांगितले की, ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, 24 भारतीय भाषांमधील प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये या माहितीच्या जाहिराती देखील जारी करण्यात आल्या आहेत. असा आहे पुरस्कार साहित्य अकादमीचे सचिव के. श्रीनिवासराव यांनी एक प्रसिद्धी पत्रक काढून सविस्तर माहिती दिली. त्यात ते म्हणतात की, साहित्य अकादमीच्या वतीने 1955 पासून दरवर्षी अकादमीने मान्य केलेल्या 24 भारतीय भाषांमध्ये साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान केले जातात. भारतीय लेखकांनी लिहिलेल्या सर्वात उल्लेखनीय पुस्तकासाठी अकादमीने मान्य केलेल्या भाषांमधून हा पुरस्कार प्रदान केला जातो. उदा. या भाषा आसामी, बंगाली, बोडो, डोगरी, इंग्रजी, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मिरी, कोकणी, मैथिली, मल्याळम, मणिपुरी, मराठी, नेपाळी, ओडिया, पंजाबी, राजस्थानी, संस्कृत, सिंधी, तमिळ, तेलगू आणि उर्दू आहेत. हे पुरस्कार एका प्रतिष्ठित समारंभात प्रदान केले जातात. 1,00,000 रुपये रोख आणि ताम्रपट या पुरस्काराचे स्वरूप आहे. कधीची मागवली पुस्तके? के. श्रीनिवासराव पुढे म्हणतात की, साहित्य अकादमीच्या वतीने लेखक, त्यांचे चाहते, प्रकाशक यांच्याकडून 2025 या वर्षाच्या साहित्य अकादमी पुरस्कारासाठी अकादमीने मान्य केलेल्या 24 भारतीय भाषांमधून पुस्तके मागवण्यात येत आहेत. संबंधित पुस्तक 2019, 2020, 2021, 2022, 2023 (अर्थात 1 जानेवारी 2019 ते 31 डिसेंबर 2023) या कालावधीत प्रथम प्रकाशित असावे. पुस्तकाच्या एका प्रतीसह दिनांक 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. संदर्भासाठी पुरस्काराबद्दलचा अधिक तपशील, साहित्य अकादमी पुरस्काराचे नियम आमच्या वेबसाईटवर www.sahitya-akademi.gov.in उपलब्ध आहेत. अर्जाचा नमुना लेखक, प्रकाशकांना आता साहित्य अकादमीच्या पुरस्कारासाठी स्वतः अर्ज भरून एक पुस्तक पाठवावे लागेल. त्यासाठी साहित्य अकादमीने अर्जाचा नमुना सुद्धा उपलब्ध करून दिला आहे. याबद्दलची सविस्तर माहिती अकादमीच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.