मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करा:मंत्रिमंडळातून बडतर्फ करा, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी

मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करा:मंत्रिमंडळातून बडतर्फ करा, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी महायुती सरकारमधील तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केलेत. मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केलेले सदरील आरोप अत्यंत गंभीर असून त्यांच्यावर तातडीने राज्य शासनाने गुन्हा दाखल करून मंत्रिमंडळातून बडतर्फ करा, अशी मागणी शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज पत्रकार परिषदेत केली. थेट लाभ हस्तांतरांचे नियम बंधनकारक असताना मंत्री धनंजय मुंडे यांनी आणि कृषीखात्याने खतांची खरेदी करताना सर्व नियम धाब्यावर बसवले. तसेच शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे हस्तांतरित न करता अनेक वस्तू बाजारपेठेतून खरेदी करण्यात आल्या. प्रत्येक गोष्टीमागे बाजारभावाच्या तुलनेत दुप्पट पैसे मोजण्यात आले असल्याने धनंजय मुंडे यांनी कृषीमंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांच्या विभागात तब्बल 88 कोटी रुपयांचा घोटाळा केला असल्याचा,गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्या मंत्र्याला ताबडतोब घराचा आहेर दाखवला पाहिजे. राज्य सरकारने कसलाही वेळ न दवडता मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे.आगामी काळात राज्याचे विधीमंडळ अधिवेशन असून त्यांच्या राजीनामा शिवाय हे अधिवेशन चालूच देणार नसल्याचा इशारा,दानवे यांनी राज्य सरकारला दिला. शेतकऱ्यांच्या टाळूवरील लोणी खाण्याचा हा प्रकार आहे.अव्वाच्या सव्वा दराने हे कृषी साधने खरेदी करण्यात आली असून विना कंत्राट देताही शासकीय आदेश काढण्यात आले असल्याची गंभीर बाब समोर आली, असल्याची माहिती अंबादास दानवे यांनी दिली. राज्याचे कृषी मंत्री असा भ्रष्ट कारभार करत असताना मुख्यमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या ही बाब लक्षात आली नाही, याचे आश्चर्य वाटते. त्यांनी ठरवून सदरील प्रकरणाकडे डोळेझाक केली आहे, अशी नाव न घेता तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अंबादास दानवे यांनी टीका केली. धनंजय मुंडे यांनी कृषी खात्याचे दिलेले भ्रष्ट प्रस्ताव तात्कालीन मुख्यमंत्री यांनी मंजुरी दिली होती, याचा अर्थ संपूर्ण सरकार यामध्ये सहभागी होते की काय? असा प्रश्न उपस्थित करत धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्यांच्या दबावाखाली तत्कालीन अधिकारी पारदर्शक कामे करू शकली नाही. व्ही. राधा सारख्या प्रामाणिक अधिकाऱ्यांना ही सुव्यवस्थित कामे करता आले नाही. कुख्यात खंडणीखोर वाल्मीक कराड कृषी खाते चालवत असल्याची, प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली. धनंजय मुंडे सारखे भ्रष्ट मंत्री कोणत्याच समाजाचे अथवा जातीचे होऊ शकत नाही.खरेतर ते समाज कंटक आहे, असा गंभीर आरोप करत शेतकरी विरोधी व्यक्तीचे कधीच कल्याण होऊ शकत नाही.धनंजय मुंडे यांच्या कृषी विभागातील भ्रष्ट कारभाराला तत्कालीन महायुती शासनाचे संरक्षण होते. गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचे काम धनंजय मुंडे यांचे आहे.वाल्मिक कराड सारख्या कुख्यात गुन्हेगाराला धनंजय मुंडे पोसतात,असा जोरदार हल्लाबोल दानवे यांनी यावेळी केला.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment