राज्यात मंत्र्यांना बहुमताचे डिप्रेशन:तर देवेंद्र फडणवीसांना वर्षावर जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा महायुतीवर पलटवार
![राज्यात मंत्र्यांना बहुमताचे डिप्रेशन:तर देवेंद्र फडणवीसांना वर्षावर जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा महायुतीवर पलटवार](https://images.bhaskarassets.com/thumb/1000x1000/web2images/5483/2025/02/06/730-x-548-2025-02-06t101509511_1738817098.jpg)
सरकारमधील कोण काय म्हणते? हे महत्त्वाचे नाही. या सरकारला विजयाचे डिप्रेशन आलेले आहे. त्यांच्यात बहुमताचे डिप्रेशन असून हा अधिक गंभीर आजार आहे. त्या डिप्रेशन मधून ते बाहेर पडायला तयार नाहीत. असे म्हणत उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारमधील मंत्र्यांना प्रत्युत्तर दिले आहे. वर्षा बंगला परिसरात कामाख्या मंदीरात बळी दिलेल्या रेड्याची शिंगे पुरली असल्याचा आरोप राऊत यांनी केला होता. त्यावरुन अनेक मंत्र्यांनी त्यांच्यावर टीका केली. त्याला राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. चुकीच्या पद्धतीने मिळवलेले बहुमत आणि त्यातून मिळालेला विजय याचा धक्का न पचवता आल्याने मंत्र्यांना डिप्रेशन आलेले आहे. वास्तविक मी काय बोललो, हे समजून घेण्यासाठी साक्षर असावे लागते तसेच इमानदार असावे लागते. फडणवीस हे वर्षा बंगल्यावर का राहत नाहीत? हा संशोधनाचा विषय आहे. त्या संदर्भात माझ्याकडे जी माहिती होती ती मी दिली. त्यावर तुम्ही काउंटर करा, उत्तर द्या, ही लोकशाही आहे. मुळात तुम्ही सर्व कामाख्या मंदिरात जाऊन अघोरी विधी केले की नाही? याच्यावर उत्तर द्या, अशी मागणीही त्यांनी केली. अघोरी विद्या ही कायद्याच्या विरोधात असताना देखील अशा पद्धतीने राजकारणात कोणी काम करत असेल तर ते महाराष्ट्राच्या पुरोगामी संस्कृतीला आणि परंपरेला शोभणारे नाही. असे जर मी म्हणत असेल आणि लोक मला वेडा म्हणतात. लोकांनी महात्मा फुले, महात्मा गांधी यांना देखील वेडे ठरवले होते. असे देखील राऊत यांनी म्हटले आहे. राज्यात सत्तेत पुरोगामी लोक नाहीत. यांना जादू टोण्यात, मंत्र याच्यात विश्वास आहे. आणि याच माध्यमातून आम्ही जिंकलो असा त्यांना आत्मविश्वास आहे. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आम्हाला त्यांची चिंता आहे. त्यांच्या कुटुंबाची चिंता आहे. त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर वर्षा वर राहायला जाऊन राज्य कारभार करावा. मात्र कोणीतरी त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे शिरसाट सारख्यांना बोलण्याची गरज नाही असे देखील राऊत यांनी म्हटले आहे. तर त्यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन राहावे या संदर्भात राऊत म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासंदर्भात अशा चर्चा होत असेल तर ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जे लोक काम करतात त्यांनी या संदर्भात काम करण्याची गरज आहे. मुख्यमंत्री अंधश्रद्धेच्या विरोधात काम करणारे व्यक्ती आहेत. हे दाखवण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे त्यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन राहावे, असा सल्ला देखील त्यांनी दिला. शिवभोजन थाळी सुरु ठेवावी शिवभोजन थाळी ही महाविकास आघाडीच्या सरकारने श्रमिक, कष्टकरी जनतेसाठी सुरू केली होती. मात्र सरकारला आता गोरगरीब जनतेला अन्न देणे परवडत नाही. कारण त्यांना राजकारणासाठी पैसा हवा आहे. तरी देखील छगन भुजबळ यांनी काळजीने ही योजना सुरु ठेवण्याची मागणी केली आहे. ही चांगली गोष्ट आहे. सरकारने ही योजना सुरु ठेवण्याची मागणीही या माध्यमातून राऊत यांनी केली आहे. बाहुबली मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी मुख्यमंत्री हे काल बीडमध्ये होते. तेथे त्यांनी खपवून घेणार नाही, चालू देणार नाही अशी भाषा वापरली. तसेच फडणवीस हे बाहुबली मुख्यमंत्री असल्याचे आमदार सुरेश धस म्हणत आहेत. तर दुसरीकडे एका सामान्य माणसावर हल्ला झाला आहे. त्यामुळे आता बाहुबली मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी. सुरेश धस यांनी हा मुद्दा देखील मार्गी लावावा, असे आवाहन संजय राऊत यांनी दिले आहे. केवळ वाल्मीक कराडच्या नावाचे भजन करून चालणार नाही. प्रत्येक स्तरावर महाराष्ट्रात गुंडगिरी आणि सुरू असल्याचा आरोप देखील संजय राऊत यांनी केला आहे.