उंडणगाव येथील लघु प्रकल्पामधून विद्युत मोटारी टाकून अवैध पाणी उपसा:धरणात केवळ २६ टक्के पाणीसाठा, भविष्यात पाणीटंचाई भासण्याची शक्यता

उंडणगाव येथील लघू प्रकल्पातून अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर अवैध पाणी उपसा केला जात आहेत. विद्युत मोटारींचा वापर करून पाणी उपसा सुरू असून, संबंधित विभाग कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे. सध्या या तलावात केवळ २६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. उंडणगाव ते खुल्लोड रस्त्यालगत शासनाने लाखो रुपये खर्च करून जुई नदीवर हा लघू प्रकल्प उभारला आहे. चांगल्या पावसामुळे तलाव तुडुंब भरला होता. मात्र, काही शेतकऱ्यांनी कोणतीही परवानगी न घेता विद्युत मोटारी टाकून दररोज मोठ्या प्रमाणावर पाणी उपसा सुरू केला. त्यामुळे तलावातील पाणी झपाट्याने कमी होत आहे. संबंधित विभागाचे अधिकारी याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहेत. या तलावावर पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून असलेल्या गावांना लवकरच भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. ग्रामपंचायतीने महसूल व पाटबंधारे विभागाशी पत्रव्यवहार केला. मात्र, केवळ थातूरमातूर कारवाई झाली. उंडणगाव व खुल्लोड गावातील नागरिकांना कायमस्वरूपी पाणीटंचाई भासू नये म्हणून शासनाने लाखो रुपये खर्च करून हा तलाव बांधला. मात्र, आता तरी संबंधित विभागाने आणि ग्रामपंचायतीने गंभीर दखल घेऊन हा अवैध पाणी उपसा त्वरित थांबवावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे. दरम्यान, याकडे संबंधित विभागाचे अधिकारी जाणूनबूजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. तलावाच्या पाणीपातळीत दिवसेंदिवस होतेय घट ; संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज उंडणगाव येथील लघू प्रकल्पातून शेतकरी अवैधरित्या पाणी उपसा करीत आहे. त्यामुळे तलावाची पाण्याची पातळी दिवसेंदिवस झपाट्याने कमी होऊ लागली आहे. काही शेतकरी दिवसा मोटारी न टाकता रात्री मोटारी सुरू करून पिकांना पाणी देत आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कांॅग्रेस पार्टी शरद पवार गटाचे सिल्लोड तालुकाध्यक्ष अजित पाटील यांनी केली आहे. उंडणगाव येथील तलावातून अवैध पाणी उपसा केला जात आहे. अवैध पाणी उपसा थांबवा ग्रामपंचायतीने संबंधित विभागाशी पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर तोडीफार काही कारवाई झाली. मात्र अजूनही बेसुमार पाणी उपसा शेतकरी बिनधास्त करत आहे. त्यांच्यावर कडक कारवाई करून पिण्यासाठी हे पाणी संरक्षित करावे. नसता भविष्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल. लक्ष्मण पाटील, सरपंच, उंडणगाव