बारामतीत साखर उद्योगासाठी एआय तंत्रज्ञान कार्यशाळा:शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन; जागतिक तज्ज्ञांचे मार्गदर्शन

साखर उद्योगाला नवी झळाळी प्राप्त करून देण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावीपणे वापर करण्यासंदर्भात विस्मा अर्थात वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन आणि ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक १५ मार्च रोजी, बारामती येथे विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्य म्हणजे या कार्यशाळेत कृत्रिम बुध्दिमत्तेव्दारे ऊस उत्पादनाची प्रात्यक्षिके पाहयला मिळणार आहेत, अशी माहिती वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे महासचिव डॉ. पांडुरंग राऊत आणि विस्माचे कार्यकारी संचालक अजित चौगुले यांनी दिली आहे. कार्यशाळा दिवशी बारामती जवळील कृषी विज्ञान केंद्रात ऊसाची प्रात्यक्षिक पाहणी केली जाणार आहे. त्यानंतर बारामती येथील शारदानगर शैक्षणिक संकुलातील मंथन सभागृहात मुख्य कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते होणार असून याप्रसंगी विस्माचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, ज्येष्ठ उद्योजक प्रतापराव पवार, ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे आदी मान्यवर सहभागी होणार आहेत. बदलत्या हवामानामुळे ऊस उत्पादनावर आणि परिणामी साखरेच्या उत्पादनावर होणाऱ्या विपरीत परिणामामुळे या उद्योगाला मोठा फटका बसतो. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करुन एकरी खर्च कमी करुन उत्पादन वाढविण्यासाठी ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने मायक्रोसॉफ्ट व ऑक्सफर्ड या जागतिक संस्थांच्या मदतीने प्रयोग केले असून ते यशस्वी झाले आहेत. कृषी क्षेत्रात आमूलाग्र क्रांती घडविण्याची सुरुवात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराने सुरू झाली असून त्याचा लाभ राज्यभरातील सहकारी व खासगी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील सर्वच ऊस उत्पादकांना व्हावा या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत कृत्रिम बुध्दिमत्तेसोबतच कारखानदारीसाठी राख विलगीकरण, कॉम्प्रेस्ड बायोगॅस, स्फुरदयुक्त सेंद्रीय खत निर्मिती, पाचटापासून बायोचार, वीजनिर्मिती करणारे छोटे यंत्र, इंधनबचत व जलशीतकरण, स्पेंटवॉशवर प्रक्रिया करणारे तंत्रज्ञान, कौटुंबिक बायोगॅस संयंत्र, गांडूळखत प्रकल्प तयार करणे, इथेनॉल, अल्कोहोल तयार करण्याची नावीन्यपूर्ण पद्धती व पुरवठा साखळी व्यवस्थापन या बाबत अमेरिका आर्यलँड, इंग्लंड व दुबई येथील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. नुकत्याच सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुध्दिमत्तेच्या वापरासाठी दोन वर्षांत पाचशे कोटी रुपये अनुदानाची घोषणा केली असल्याने भविष्याचा वेध घेत या मौलिक मार्गदर्शक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.