सांगलीमध्ये हिट अन्ड रनचा थरार:फॉर्च्यूनरने 7-8 दुचाकींना उडवलं, गावकऱ्यांनी पाठलाग करत पकडले, माधवनगर-खोतवाडी मार्गावरील घटना

सांगलीच्या माधवनगर ते खोतवाडी मार्गावा भरधाव कारचालकाने 3 गावांमधील 7 ते 8 दुचाकींना उडवत पळ काढला. आपल्या गावातील व्यक्तीला उडवून पळणाऱ्या कारचा पाठलाग करत गावकऱ्यांनी त्याला खोतवाडी येथे गाठले अन् शेतात चारचाकी अडवून धरली. दरम्यान शेकडोने असणाऱ्या नागरिकांच्या जमावाला पोलिसांनी तत्काळ पांगवत चालकाला ताब्यात घेतले. आटपाडी तालुक्यातील गोमेवाडी येथील तो चालक असल्याचे समजते. दरम्यान, 4 ते 5 जण जखमी झाले असून, रात्री उशिरा सांगली ग्रामीण पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नीतेश पाटील असे चालकाचे नाव असून तो आटपाडी तालुक्यातील असल्याचे समजते. चालकासह गाडीतील महिलाही जखमी झाली आहे. नेमके काय घडले? मिळालेल्या माहितीनुसार, कारचालक नीतेश पाटील आलिशान कार घेऊन माधवनगर ते बुधगाव या मार्गावर रात्री साडे आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास निघाला होता. यावेळी वसंतदादा कारखान्यासमोर एका दुचाकीला धडक दिली. तो पळून जात असताना मध्ये येणाऱ्या 6-7 दुचाकींना त्याने उडवल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. बुधगाव येथे एका मोटारसायकलस्वाराला त्याने फरफटत नेले. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला तर दुचाकीचे मोठे नुकसान झाले. नागरिक पाठलाग करत असल्याचे पाहून त्याने भरधाव वेगात गाडी खोतवाडीकडे नेली. यावेळी त्याने खोतवाडी गावाच्या स्वागत कमानीला गाडी धडकवल्याने ती थेट शेतात जाऊन आदळली. सिद्धापूरवाडीजवळ अपघात; 4 जण गंभीर आपल्या कुटुंबीयासमवेत सौंदत्ती येथील यल्लमा देवीच्या दर्शनासाठी जात असताना दुसऱ्या वाहनाची बाजू काढत असताना समोरून येणाऱ्या वाहनाला जोराची धडक बसल्याने मोटारीतील दोघे भाविक ठार झाले. मोटार चालक आणि तिघे जण गंभीर जखमी झाले. त्यांना चिक्कोडी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. चिक्कोडी-सांगली रस्त्यावर सिद्धापूरवाडी गावाजवळ शनिवारी (ता. 15) हा अपघात झाला. त्यात सांगली येथील तुकाराम कोळी (वय 72) व कल्पना अजित कोळी (वय 32) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.