महाबोधी महाविहार मुक्तीसाठी नागपुरात शांती मार्च:हजारो अनुयायांसह भदंत ससाई यांच्या नेतृत्वात मोर्चा

नागपूर येथे महाबोधी महाविहार मुक्तीसाठी भव्य शांती मार्च काढण्यात आला. भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या नेतृत्वात रविवारी सकाळी जरीपटका येथील भीम चौकातून हा मार्च सुरू झाला. बौद्ध धर्मीयांचे पवित्र स्थळ असलेल्या बोधगया येथील महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्धांच्या हाती देण्याची मागणी आहे. सम्राट अशोकांनी बांधलेल्या या महाविहारासाठी १९९२ पासून आंदोलन सुरू आहे. आतापर्यंत १८ टप्प्यांत हे आंदोलन करण्यात आले आहे. शांती मार्चात सहभागी झालेल्या आंबेडकरी अनुयायांनी पंचशील ध्वज आणि निळी टोपी धारण केली होती. मार्चदरम्यान इंदोरा चौकात भिक्खू संघावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. मार्च संविधान चौकात पोहोचल्यानंतर भदंत सुरई ससाई यांनी डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केले. या आंदोलनाला देश-विदेशातून लाखो उपासक-उपासिकांचे समर्थन मिळाले आहे. बिहार, पटना, बुद्धगया आणि दिल्लीसह विविध ठिकाणी आंदोलने करण्यात आली. मार्चमध्ये अ. भा. धम्मसेना, महाबोधी भिक्खू-भिक्खूनी महासंघ, समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा आणि समस्त बुद्धविहार समितीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. गौतम अंबादे, हिमांशू उके, अर्चना राळे, वर्षा बोरकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी मार्चचे आयोजन केले. भदंत ससाई यांनी सहभागी झालेल्या सर्व अनुयायांचे आभार मानले आणि आंदोलनाची धग अजूनही कायम असल्याचे सांगितले.