विद्यापीठ सिनेटचा निर्णय व्यवस्थापन परिषदेने पलटवला:संविधान शिलालेखावर प्रस्तावकाचे नाव लिहिण्यास नकार; सिनेट सभागृहाच्या अधिकारांचा प्रश्न उपस्थित

अमरावती विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने सिनेटच्या निर्णयाला फाटा देत वादाला तोंड फोडले आहे. विद्यापीठात संविधानाच्या प्रास्ताविकेचा शिलालेख उभारण्यात आला होता. या उपक्रमाचे प्रस्तावक डॉ. संतोष बनसोड यांचे नाव शिलालेखावर लिहिण्याचा प्रस्ताव सिनेटने मंजूर केला होता. कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांनी पीठासीन सभापती म्हणून या निर्णयाला मान्यता दिली होती. मात्र, व्यवस्थापन परिषदेने हा निर्णय बदलत शिलालेखावर केवळ सांविधिक अधिकाऱ्यांचीच नावे नमूद करण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणी प्राचार्य डॉ. सुभाष गवई यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी हा मुद्दा सिनेट सभागृहाच्या अस्तित्वाचा व संरक्षणाचा असल्याचे सांगितले. व्यवस्थापन परिषदेचे प्रतिनिधी सिनेट सभेत उपस्थित असताना आपली भूमिका न मांडता नंतर निर्णय बदलण्याची कृती योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्राचार्य गवई यांनी या कृतीला हक्कभंग म्हटले आहे. सिनेटने सर्वानुमते घेतलेला आणि कुलगुरूंनी मान्य केलेला निर्णय व्यवस्थापन परिषदेने बदलणे हे सिनेटच्या अधिकारांवर गदा आणणारे असल्याचे त्यांनी नमूद केले. या वादामुळे विद्यापीठातील निर्णय प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.