राजस्थानच्या महिला पुराेहित लग्न-मौंजीपासून ते अंत्यसंस्कारांचेसर्व विधी करतात:दक्षिणेची रक्कम मुलींच्या शिक्षणासाठी दान

लग्न-मौंजीपासून ते अंत्यसंस्कारांपर्यंत… सहसा सर्व विधी पुरुषच करत आले आहेत. परंतु राजस्थानातील उदयपूरच्या ६४ वर्षीय सरला गुप्ता अपवाद आहेत. त्यांनी ५ वर्षांत ५० हून अधिक विवाह व ७० अंत्यविधी केले आहेत. यासाठी त्यांनी वैदिक प्रशिक्षणही घेतले. सर्व विधी आणि मंत्र शिकल्या. सर्वप्रथम त्यांनी आर्य समाजात विवाह लावले. नंतर जयपूर, प्रयागराज, अजमेर आदी शहरांमधून फोन येऊ लागले. त्यांनी अंत्यसंस्कारांसारख्या गोष्टींसाठी दक्षिणा घेऊ नये असा स्वत:साठी नियम बनवला. त्या फक्त लग्न, माैंज यासारख्या शुभकार्याचीच दक्षिणा घेतात. ही रक्कमही मुलींच्या शिक्षणासाठी उदयपूरमधील दयानंद कन्या विद्यालय, चित्तोडगडमधील पद्मिनी आर्य कन्या गुरुकुल, नागालँडच्या राणी गायदुलू गुरुकुल व उत्तर प्रदेशातील न्योतारा या ४ गुरुकुलांना दान करतात. सरलांनी २०१६ पासून लग्न, माैंज, कान टोचणे आदी शुभकार्यांना सुरुवात केली, परंतु कोरोना काळात अंत्यसंस्कारही करू लागल्या. त्या म्हणतात, ‘कोविडमध्ये मी मृताच्या नातलगांना अंत्यसंस्कारासाठी पुराेहितांना विनंती करताना पाहिले, तेव्हा मीही हे काम सुरू केले.’ लग्नसोहळ्यातही काही साहित्य आणायला सांगितल्यास त्या स्वतः घेऊन जातात. निर्णय…पतीच्या निवृत्तीनंतर प्रशिक्षण घेऊन केली सुरुवात सरला म्हणाल्या, कुटुंबातील सदस्य आर्य समाज मानतात. लहानपणी घरी दररोज हवन होत असे. २०१६ मध्ये पती राजकुमार गुप्ता हिंदुस्तान झिंकमधून निवृत्त झाले तेव्हा सरला यांनी त्यांच्यासमोर पौरोहित्य करण्याची इच्छा व्यक्त केली. होकारानंतर गुजरातेतील अजमेर आणि रोजड येथील आर्य समाज शिबिरांतून प्रशिक्षण घेतले. उदयपूरच्या आर्य समाजात सहभागी झाल्या. इतर पुरोहितांसोबत त्या लग्न आणि इतर विधींमध्ये सहभागी होऊ लागल्या. सुरुवातीला लोक पाठीमागे कुजबुज करत. पण आता मात्र त्यांचे खूप कौतुक करतात. पौरोहित्याचे प्रशिक्षण इतर महिलांनाही देतात
धार्मिक कार्यांसाठी इतर महिलांना देतात प्रेरणा… सरला गुप्ता ज्या ज्या घरी जातात तेथे त्या घरातील महिलांना धार्मिक कार्यासाठी प्रेरित करतात. अनेक ठिकाणच्या महिला आता त्यांच्यासोबत सहभागी झाल्या आहेत. भारतात अंत्यसंस्कार करणाऱ्या फक्त तीनच महिला असल्याचा त्यांचा दावा आहे.