पतीच्या विरोधात लक्षवेधी; पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न:सुरगाण्याचे आमदार नितीन पवार यांची लक्षवेधी

ग्रामसेवक असलेल्या आपल्या पतीविराेधात कळवण- सुरगाणा (जि. नाशिक) मतदारसंघाचे आमदार नितीन पवार यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा शीतल महाजन यांनी शनिवारी आत्महत्येचा प्रयत्न केला. नितीन पवार व त्यांच्या पत्नी जयश्री पवार यांच्या छळाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलल्याची तक्रार शीतल यांचे बंधू याेगेश गायकवाड यांनी अभाेणा पाेलिस ठाण्यात दिली. दरम्यान, “आपण महाजन कुटुंबीयांना कधी भेटलोही नाही. जर त्यांनी चुकीचे काम केले नाही तर घाबरतात कशाला? लोकप्रतिनिधींनी लक्षवेधी मांडायची नाही का?’ असा सवाल करत पवार यांनी आरोपांचे खंडन केले. तक्रार अर्जात म्हटले आहे, शीतल यांचे पती ग्रामसेवक आहेत. विधानसभा निवडणुकीत आमदार नितीन पवार यांच्या विरोधात काम केल्यामुळे पवार दांपत्य ग्रामसेवक असलेल्या रामराव महाजन यांना खोट्या तक्रारी करून अडकवण्याचा प्रयत्न करते. मात्र, अनेक वेळा तक्रारींची चौकशी होऊनही तक्रारीत तथ्य आढळलेले नाही. तरीही त्रास सुरूच होता. आता तर आमदारांनी विधानसभेत लक्षवेधी उपस्थित करत महाजन यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. त्याच त्रासाला कंटाळून आपली बहीण शीतल यांनी विषारी औषधाचे सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आराेप तक्रारदार गायकवाड यांनी केला आहे. शीतल महाजन यांनी आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूवी लिहिलेल्या चिठ्ठीत आमदार नितीन पवार, जयश्री पवार, देवका ठाकरे, मीना भाेये, हेमंत भाेये यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत आहे. माझे पती जबाबदार कर्मचारी असून त्यांना बदनाम करण्यासाठी व निलंबनासाठी भाग पाडले जात असल्याचे म्हटले आहे. तक्रारीची शहानिशा करून पुढील कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. महाजन कुटुंबीयांना प्रत्यक्ष कधी भेटलाेच नाही
माझ्या नावाची चिठ्ठी लिहून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे मला पत्रकारांचा फाेन आल्यावर कळले. मी महाजन कुटुंबीयांना प्रत्यक्षात कधीच भेटलाे नाही, तर मग त्रास देण्याचा प्रश्न येताे कुठे? लाेकप्रतिनिधी म्हणून मी लक्षवेधी मांडली. जर चुकीचे काम केले नाही तर मग घाबरतात कशाला? – नितीन पवार, आमदार