महिलांच्या सक्षमीकरणात त्यांच्या आरोग्याचा मोठा वाटा-सोनल कामे:ज्येष्ठ नागरिक संघाकडून महिला दिन उत्साहात साजरा

प्रतिनिधी | अकोला महिला आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करतात. महिलांच्या सक्षमीकरणात आरोग्याचा फार मोठा वाटा आहे. यावर भर दिला गेला पाहिजे. ज्येष्ठ महिलांनी आपल्याला कोणी विचारावे व दवाखान्यात न्यावे याची वाट पाहू नये, तर स्वतःच स्वतः च्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे मार्गदर्शन सोनल कामे यांनी केले. ज्येष्ठ नागरिक संघ महिला समितीच्या वतीने महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी संघाच्या महिला समितीच्या अध्यक्षा संध्या संगवई, तर मंचावर समितीच्या सचिव निशा कुळकर्णी उपस्थित होत्या. याप्रसंगी “ज्येष्ठ आई पूजन’ करण्यात आले. ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य शिवप्रकाश मंत्री यांच्या मातोश्री विद्या मंत्री यांचे पूजन करण्यात आहे. या उपक्रमाचे प्रायोजक अशोक कुळकर्णी यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रा. सोनल कामे यांनी भाषणात महिलांच्या आरोग्यावर भर दिला. यानंतर महानगरातील विविध क्षेत्रात उतम कामगिरी करणाऱ्या पाच महिलांचा सत्कार करण्यात आला. यात महिला न्यायधीश शैलजा पांडेय, माहिती व तंत्रज्ञ मोहिनी मोडक, विक्रीकर अधिकारी अंशुल सरोदे, युद्ध कला प्रशिक्षक अंजली पाटणकर, सर्पमित्र सुरेखा बडगे यांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण यावेळी करण्यात आले. निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक ज्योती बाहेती, द्वितीय क्रमांक ज्योत्स्ना तापडिया, तृतीय क्रमांक श्रद्धा भोकरे यांना मिळाला. प्राची प्रदीप पिंप्रीकर व भावना मुळे यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. संध्या संगवई यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन आकांक्षा देशमुख व शरयू देशपांडे यांनी केले. प्रास्ताविक महिला समितीच्या सचिव निशा कुळकर्णी यांनी केले. प्रार्थना शोभा मांजरे व ज्योति जोशी यांनी म्हटली. आभारप्रदर्शन शोभा मांजरे यांनी केले. अल्का वैद्य व हेमांगिनी गाडगे यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत कुळकर्णी, उपाध्यक्ष प्रकाश शेगोकार, सुनील खोत, प्रभाकर देशपांडे आदी पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले.