पुण्यात संगीत नाट्य महोत्सव:भरत नाट्य मंदिरात होणार प्रसिद्ध नाटकांचे सादरीकरण; १९ मार्चपासून आयोजन, प्रवेश मोफत

पुण्यात तीन दिवसीय संगीत नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचा सांस्कृतिक कार्य संचालनालयाचा सांस्कृतिक कार्य विभाग मुंबईतर्फे हा बुधवार १९ मार्च ते शुक्रवार दिनांक २१ मार्च दरम्यान भरत नाट्य मंदिरात हा महोत्सव होईल. विशेष म्हणजे रसिकांना या ठिकाणी मोफत प्रवेश असेल. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या पुढाकारातून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजे बुधवार, दिनांक १९ मार्च रोजी कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर लिखित ‘संगीत स्वयंवर’ हे कलाव्दयी निर्मित संगीत नाटक बालगंधर्व संगीत रसिक मंडळ सादर करणार आहे. या नाटकाला देवगंधर्व भास्करबुवा बखले यांचे संगीत आहे. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवार, दिनांक २० मार्च रोजी ‘संगीत बावनखणी’ हे विद्याधर गोखले लिखित आणि यशवंत देव यांचे संगीत असलेले नाटक विद्याधर गोखले संगीत नाट्य प्रतिष्ठान सादर करणार आहे. श्रीकांत दादरकर यांनी हे नाटक दिग्दर्शित केले असून, संगीत मार्गदर्शन ज्ञानेश पेंढारकर यांचे, तर नृत्य मार्गदर्शन स्मृती तळपदे यांचे आहे. महोत्सवात तिसऱ्या म्हणजे शेवटच्या दिवशी शुक्रवार, दिनांक २१ मार्च रोजी भरत नाट्य मंदिर, पुणे निर्मित ‘संगीत मानापमान’ हे नाटक सादर केले जाणार आहे. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर लिखित या नाटकाला गोविंदराव टेंबे यांचे संगीत लाभले आहे. रसिकांसाठी विनामूल्य असलेल्या या संगीत नाट्य महोत्सवासाठी प्रवेशिका आवश्यक आहेत. महोत्सवाच्या शिल्लक प्रवेशिका भरत नाट्य मंदिर, पुणे येथे उपलब्ध असून रसिकांनी या महोत्सवाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय,मुंबईचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.