परभन्ना फाउंडेशनचा सेवाकार्य कृतज्ञता पुरस्कार सोहळा:16 क्षेत्रांतील मान्यवरांचा सन्मान; अजय पुरकरांनी अधोरेखित केले शिवरायांच्या आदर्शांचे महत्त्व

परभन्ना फाउंडेशनचा सेवाकार्य कृतज्ञता पुरस्कार सोहळा:16 क्षेत्रांतील मान्यवरांचा सन्मान; अजय पुरकरांनी अधोरेखित केले शिवरायांच्या आदर्शांचे महत्त्व

आज समाजात त्याग, बलिदान, शौर्य, निष्ठेची कमी असून, सर्वच क्षेत्रांत आपण ते पाहत आहोत. आजच्या तरुण पिढीला आपले आदर्श कोण असावेत, हेच माहिती नाही. छत्रपती श्री शिवाजी महाराज हे आपल्यासाठी आदर्श असून, त्यांनी घालून दिलेले पायंडे अभ्यासून पावले टाकल्यास प्रत्येकाचे आयुष्य सुखकर होईल, असा विश्वास अभिनेते अजय पुरकर यांनी व्यक्त केला. नव्या पिढीसमोर आदर्श ठेवण्यासाठी समाजातील चांगल्या व्यक्तिमत्त्वांना सन्मानित करण्याचा उपक्रम स्तुत्य आहे, असेही ते म्हणाले. परभन्ना फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘सेवाकार्य कृतज्ञता पुरस्कार २०२५’ वितरणाप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक हे होते. यावेळी यशदाचे अधिकारी डॉ. बबन जोगदंड, वल्लरी प्रकाशनाचे संचालक व्यंकटेश कल्याणकर, फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश चप्पलवार, पंकज चव्हाण, मनिषा उगले व अन्य मान्यवर उपस्थित होते. फाउंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार वितरण डॉ. मुळीक व पुरकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यामध्ये सेवाकार्य पुरस्कार्थींमध्ये प्रशासकीय आनंद इंगोले, साहित्य हिंदूराव पवार, कला- बाबूराव उप्पलवार, पर्यटन मंगल भिंगारे, पोलिस प्रशासन-महेशकुमार सरतापे, पर्यावरण-अजय मिठारे, उद्योजक राजेंद्र कडू, पत्रकारिता मिकी घई, स्टार्टअप संतोष पानसरे, सांस्कृतिक स्वप्निल कुलकर्णी, सामाजिक-डॉ. सुरेश पाशमवार, राजकीय-शर्मिला येवले, संशोधन गोवर्धन सोनवणे, शैक्षणिक गजानन मोरे, आरोग्य डॉ. सुनील चव्हाण आणि विशेष पुरस्कार प्रा. डॉ. सुनील धनगर यांना सन्मानित करण्यात आले. डॉ. बुधाजीराव मुळीक म्हणाले, शेती पिकातील तण जसे शेतकरी काढून टाकतो. त्याचप्रमाणे समाजातील तण काढून टाकण्याची आज आवश्यकता आहे. त्यासाठी तुमचे मनगटच तुम्हाला सबळ म्हणून कामाला येते. त्यामुळे शिक्षणाबरोबर आपल्या मुलांना सुसंस्कृत केले पाहिजे. तरच समाजात प्रामाणिक माणसांची संख्या वाढेल. यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन केले आणि पुरस्कारार्थींनी मनोगते व्यक्त केली. धोंडू बाजी चव्हाण प्रतिष्ठानचे पंकज चव्हाण व प्रा. सुनील धनगर यांनी सूत्रसंचालन केले.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment