न्यास नोंदणी कार्यालयातील शिपायासह एकास लाच घेताना पकडले:निकालाची प्रत देण्यासाठी मागितली होती 9 हजारांची लाच

हिंगोली येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयातील शिपायासह अन्य एकास निकालाची प्रत देण्यासाठी 9,000 ची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी तारीख 17 रोजी रंगेहात पकडले. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथील महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेची नोंदणी 8 मार्च 2022 रोजी रद्द करण्यात आली होती. या प्रकरणात सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालय हिंगोली यांच्याकडे सुनावणी झाली होती. या सुनावणीमध्ये कार्यालयाने संस्थेच्या बाजूने निकाल दिला होता. मात्र या निकालाची प्रत संस्था अध्यक्षाला मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी कार्यालयाकडे निकालाची प्रत मिळण्याबाबत अर्ज केला होता. त्यानंतर 12 मार्च रोजी तक्रारदाराच्या ओळखीचे असलेले सुनील हटकर याने तक्रादाराशी संपर्क साधून तुमचे काम करून देण्यासाठी कार्यालयाचे शिपाई कुलभूषण रोठे याने दहा हजार रुपयाची रक्कम लागते असा निरोप दिला. त्यावरून तक्रारदाराने शिपाई रोठे याची भेट घेतली असता त्याने ओळखीने काम करून देण्यासाठी दहा हजार रुपयाची मागणी केली. याप्रकरणी तक्रारदाराने हिंगोलीच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार केली. या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. दरम्यान आज लाच लुचपतचे उपाधिक्षक विकास घनवट, पोलिस निरीक्षक प्रफुल्ल अंकुशकर, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक युनूस शेख, विजय शुक्ला, जमादार ज्ञानेश्वर पंचलिंगे, भगवान मंडलिक, राजाराम फुपाटे, गजानन पवार, तानाजी मुंडे, रवींद्र वरणे, गोविंद शिंदे, वाघ, शेख अकबर महिला पोलिस कर्मचारी योगिता अवचार यांच्या पथकाने आज सापळा रचला होता. सदर रक्कम शिपाई कुलभूषण याने सुनील याच्याकडे देण्यास सांगितले. तक्रारदाराकडून लाच घेताच पथकाने सुनील व कुलभूषण यांना रंगेहात पकडले. याप्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.