जिल्हा परिषदेच्या तक्रार निवारण दिनात धक्कादायक प्रकरण:नागरिकांची कर भरण्याची तयारी, पण प्रशासनाकडून टाळाटाळ

अमरावती जिल्हा परिषदेच्या तक्रार निवारण दिनात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. नागरिक स्वतःहून कर भरण्यास तयार असताना प्रशासकीय यंत्रणा मात्र कर आकारणी करण्यास टाळाटाळ करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र यांनी दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारी तक्रार निवारण दिन सुरू केला आहे. या दिवशी सात महत्त्वपूर्ण तक्रारी समोर आल्या. सीईओंनी स्वतः तक्रारदारांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पहुरचे अमोल ठाकरे यांनी स्वतःहून घराची कर आकारणी करण्याची विनंती केली. मात्र, ग्रामसेवकाने कारवाई न केल्याने ते कर भरू शकले नाहीत. टेंभा येथील प्रभाकर ठाकरे यांना जागेचा नमुना आठ-अ न मिळाल्याने करभरणा करता आला नाही. भातकुली तालुक्यातील नवथळ येथील सुखदेव रायबोले यांच्या प्रकरणात विस्तार अधिकारी तेलंग यांनी चौकशीला हजर राहणे आवश्यक असताना ते गैरहजर राहिले. या प्रकरणी सीईओंनी २४ तासांत खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. श्यामकांत देशमुख, निलेश वानखडे, स्वप्नील निमकाळे आणि संदीप वानखडे यांनीही विविध समस्या मांडल्या. सीईओ महापात्र यांनी सर्व तक्रारींची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना योग्य कारवाईचे निर्देश दिले आहेत.