५ लाखांच्या लाच प्रकरणी न्यायाधीशांना जामीन नाही:दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने दिला नकार

संशयित आरोपीला जामीन देण्यासाठी मध्यस्थामार्फत ५ लाख रुपये लाच घेतल्याचा सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी त्यांनी अर्ज केला होता. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने तो फेटाळून लावला.
न्यायाधीश निकम यांनी त्यांचे निकटवर्तीय खरात बंधूंमार्फत लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल झाली होती. या तक्रारीवरून पुणे-सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये सापळा रचून न्यायाधीशांना पकडले होते. त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता, पण आपला यात सहभाग नसल्याचा निकम यांचा दावा आहे. या प्रकरणात अटकपूर्व जामिनासाठी त्यांनी सातारा कोर्टात अर्ज दिला होता. पण तो फेटाळण्यात आला. यानंतर निकम यांनी हायकोर्टात धाव घेतली. पण त्यांच्याविरोधात लाच प्रकरणात सहभागाचे पुरावे असल्याचा एसीबीने केलेला दावा हायकोर्टाने ग्राह्य धरून अटकपूर्व जामिनासाठीचा अर्ज फेटाळून लावला.