ज्ञानदान उन्हात! मालकाने शाळेला कुलूप ठोकल्याने विद्यार्थी रस्त्यावर:जांभूळवाडी ग्रामस्थांचे उपोषण, जागेच्या बक्षीसपत्राची नोंद चुकून दुसऱ्या उताऱ्यावर

प्रतिनिधी | पाथर्डी तालुक्यातील एकनाथवाडी अंतर्गत जांभूळवाडी येथील प्राथमिक शाळेला दिलेल्या जागेच्या बक्षीसपत्राच्या गट नंबरची नोंद चुकीची लागून अन्य क्षेत्रामध्ये झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांना रखरखत्या उन्हात बसून शिक्षण घेण्याची वेळ आली. गेल्या साडेपाच महिन्यांपासून जागामालकाने शाळा खोल्यांना कुलूप लावले. हे कुलूप उघडून विद्यार्थ्यांना शाळेत बसण्याची सोय करावी, या मागणीसाठी विद्यार्थ्यांसह पालकांनी सोमवारी (१७ मार्च) गटविकास अधिकाऱ्याच्या दारात उपोषण सुरू केले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरद टेकाळे, उपसरपंच सचिन गायकवाड, भारत खेडकर आदींसह ग्रामस्थ उपोषण करीत आहेत. ते म्हणाले, की शाळेचा पट २२ असून, पहिली ते चौथीपर्यंत शाळा आहे. मागील पाच-सहा महिन्यांपासून जागामालकाने शाळेला कुलूप लावले आहे. याबाबत आम्ही शिक्षण विभाग व पंचायत समिती प्रशासनाला वेळोवेळी कळवले. मात्र, प्रशासनाने ही गोष्ट फारशी गांभीर्याने न घेता, केवळ परस्परांना पत्र देण्यात व खुलासे विचारण्यात वेळ घातला. पर्यायी व्यवस्था करण्याची तसदीही शिक्षण विभागाने घेतली नाही. शाळेसाठी ज्या शेतकऱ्यांनी जागा दिली, त्याची नोंद बक्षीसपत्राच्या आधारे होणे आवश्यक होते. तथापि, त्याची नोंद अन्य गट नंबरमध्ये झाल्याने शाळेसाठी दिलेले गट एका उताऱ्यावर, तर प्रत्यक्षात शाळा दुसऱ्या गटात झाली. ही चूक दुरुस्त करण्याची गरज आहे. कार्यकर्त्यांनी प्रशासनाला फोन केल्यास ‘मुख्याध्यापकांना सांगतो, लवकरच होईल’ अशी मोघम उत्तरे दिली जातात. शाळा बंद असल्याने वर्दळीच्या रस्त्याच्या बाजूला लिंबाखाली विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागते. शालेय पोषण आहारही तेथेच मिळतो. रखरखत्या उन्हात ज्ञानाचे धडे गिरवण्याची वेळ या विद्यार्थ्यांवर आली आहे. २२ विद्यार्थ्यांसाठी दोन शिक्षक असून, तेही भर उन्हातच ज्ञानदानाचे काम करतात. शाळेला कुलूप लावल्याने द्वितीय सत्राची पुस्तके आत राहिली. वार्षिक परीक्षा तोंडावर आली असताना, हे विद्यार्थी परीक्षेत काय लिहिणार, असा प्रश्न पालकांना पडला आहे. उन्हाचा काही विद्यार्थ्यांना त्रासही झाला. पालकांनी उपचार करून त्यांना पुन्हा या रस्त्यावरच्या शाळेत पाठवले. गेल्या १० तारखेला ग्रामस्थांनी प्रांताधिकारी, तहसीलदार, पंचायत समिती शिक्षण विभाग व पोलिसांना निवेदन दिले. विशेष म्हणजे, पंचायत समिती व शिक्षण विभागाकडून हे पत्रही गहाळ झाले. १५ दिवसांत दुरुस्ती करू आंदोलकांकडूनच परत निवेदन घेऊन त्याचा अभ्यास करीत गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे, प्रभारी गटशिक्षणाधिकारी अनिल भवर यांसह केंद्रप्रमुख व अन्य कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे चर्चा करीत मार्ग काढला. ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे गटविकास अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणले. त्यानंतर झालेली चूक १५ दिवसांत दुरुस्त करण्याचे आश्वासन गटविकास अधिकाऱ्यांकडून मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेतले.