औरंगजेब तुमचा नातेवाईक होता का?:एकनाथ शिंदे संतापले; देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीकेनंतर सभागृहात विरोधकांना सुनावले

औरंगजेबाचे उदात्तीकरण करायला तो काय तुमचा नातेवाईक होता का? असा प्रश्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विचारला आहे. औरंगजेबाचे उदात्तीकरण आणि समर्थन सहन केले जाणार नाही, असा इशारा देखील त्यांनी दिला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना औरंगजेबासोबत केली होती. त्यामुळे सपकाळ देखील देशद्रोही असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. सपकाळ यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, असा कडक इशारा शिंदे यांनी दिला आहे. औरंगजेब महाराष्ट्राला लागलेला कलंक असल्याचे देखील ते म्हणाले. हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्र्यांची तुलना क्रुर प्रशासक म्हणून औरंगजेबाशी केली. औरंगजेब हा देशद्रोही होता. त्याने धर्मवीर संभाजी महाराज यांचा छळ केला, त्यांचे डोळे काढले, जीभ छाटली. मुख्यमंत्र्यांनी सपकाळ यांची जीभ छाटली का? डोळे काढले का? चांबडी सोलली का? असे प्रश्न शिंदे यांनी उपस्थित केले. तुम्ही कोणाची तुलना कोणाशी करत आहात? असा प्रश्न त्यांनी काँग्रेसला विचारला. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना तुम्ही औरंगजेबाशी करता का? तुमचे काय चालले? असेही शिंदे यांनी नाना पटोले यांना विचारले आहे. तुमचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागायला हवी. अन्यथा ते औरंगजेबाचे समर्थन करत असल्याने तेही देशद्रोही ठरत असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. गेल्या काही दिवसापासून या राज्यामध्ये औरंगजेबाचे उदात्तीकरण का सुरू आहे? कोणी सुरू केले? कशासाठी सुरू केले? त्याच्या मुळाशी सरकार जाणारच असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. मात्र, औरंगजेब हा चांगला प्रशासक होता, शिवाजी महाराजांसारखा होता, अशी तुलना अबू आझमी यांनी केली होती. त्याच वेळी आझमी यांना समज दिली होती. मात्र, औरंगजेबाचे उदात्तीकरण योग्य आहे का? हा माझा प्रश्न असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.