मी माझ्या वक्तव्यावर ठाम, माफी मागणार नाही:हर्षवर्धन सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेवर दिले स्पष्टीकरण

औरंगजेब हा क्रूर शासक होता. आज देवेंद्र फडणवीस हे देखील तेवढेच क्रूर आहेत, अशी विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले होते. आपल्या या विधानावर हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टीकरण दिले आहे. तसेच मी माझ्या वक्तव्यावर ठाम असल्याचेही ते म्हणाले. आमची टीका ही राजकीय टीका आहे. मी फडणवीसांवर व्यक्तिगत टीका केलेली नाही तर राज्य कारभारावर केलेली आहे, असे स्पष्टीकरण हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबाबत विधान केल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीसांची माफी मागावी, अशी मागणी सत्ताधाऱ्यांकडून केली जात होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेली टीका ही महाराष्ट्राच्या अस्मितेवरची टीका असल्याचे म्हटले होते. तर सपकाळांनी फडणवीसांची माफी मागावी आणि विषय संपवावा, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते. यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिले. तसेच मी माझ्या विधानावर ठाम असल्याचे म्हटले. नेमके काय म्हणाले हर्षवर्धन सपकाळ? मी महायुती सरकारच्या कारभाराची तुलना औरंगजेबाच्या कारभाराशी केली. त्याचा मोठा संदर्भ आहे. मी असाच संदर्भ देऊन बीडमध्ये देखील बोललो होतो. आता या विषयाच्या संदर्भात भाजपचे नेते आणि त्यांचे मित्रपक्ष त्यांना औरंगजेब म्हणण्यात का गुंतले आहेत? हे मला काही समजत नाही. औरंगजेब क्रूर होता, हेच माझे म्हणणे होते आणि मी देखील तेच म्हटले होते. यात औरंगजेबाच्या उदात्तीकरणाचा काही विषय नाही, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले. सरकार औरंगजेबाप्रमाणे जिझिया कर लावतंय मी केलेले विधान राज्यकारभाराच्या अनुषंगाने होते. औरंगजेब ज्या क्रूर पद्धतीने राज्यकारभार चालवत होता, त्याच पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा कारभार चालला आहे, असे विधान केले होते. त्या विधानावर मी अद्यापही ठाम आहे. जसे औरंगजेबाने जिझिया कर लावला होता, तसाच कर आता महाराष्ट्रातील सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस लावत आहेत. शाळेच्या वह्या, पुस्तकावर कर लावला, स्मशान भूमीतील लाकडांवरही कर लावला आहे. त्यामुळे ही सर्व कार्यप्रणाली त्याच प्रकारची असल्याचे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. मी केलेली टीका अतिशयोक्ती नाही आमची टीका ही राजकीय टीका आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना शब्दांचा तोल कुठेही गेलेला नाही. फडणवीस हेच औरंगजेब आहेत असे मी बोललेलो नाही. त्यांनी तशीच वेशभूषा करावी आणि ते तसेच आहेत असे मी म्हटलेले नाही. देवेंद्र फडणवीस यांच्यावर मी व्यक्तिगत टीका केलेली नाही. राज्य कारभारावर टीका केलेली आहे आणि ती टीका करणे हा आमचा अधिकार आहे, असे सांगत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिले. तसेच मी केलेली टीका अतिशयोक्ती नाही, असेही ते म्हणाले. देशमुख हत्या प्रकरणावेळी अस्मितेला धक्का लागत नाही का? आता मी केलेली टीका ही महाराष्ट्राच्या अस्मितेवरची टीका असल्याचे भाजपच्या प्रदेशाध्यक्ष म्हटले. मात्र, जेव्हा संतोष देशमुख यांची हत्या होते, तेव्हा महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लागत नाही का? स्वारगेटच्या बसस्थानकात अत्याचाराची घटना घडते तेव्हा महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लागत नाही का?, असा सवाल हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारला विचारले.