मुंबईत 1,820 महिलांसाठी फक्त 1 सार्वजनिक शौचालय:चित्रा वाघ यांनी मांडला विषय; तर सरकारचे मोफत व सुरक्षित स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्याचे आश्वासन

मुंबईसह राज्यातील महिलांसाठी मोफत सुरक्षित आणि स्वच्छ सार्वजनिक स्वच्छतागृहे आवश्यक असल्याचे आमदार चित्रा वाघ यांनी सभागृहात म्हटले आहे. महिलांचा बरेच वर्षे दुर्लक्षित प्रलंबित असलेला आणि अतिशय महत्त्वाचा असा प्रश्न म्हणजे स्वच्छतागृहांचा प्रश्न असल्याचे म्हणत त्यांनी आज विधानपरिषदेत हा विषय मांडला. मुंबईत 1,820 महिलांसाठी फक्त 1 सार्वजनिक शौचालय उपलब्ध असल्याचे धक्कादायक वास्तव असल्याचे त्यांनी सभागृहासमोर सांगितले. शौचालयांची अपुरी संख्या, अस्वच्छता आणि सुरक्षिततेचा अभाव यामुळे महिलांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यामुळे आज राज्यातील महिलांसाठी मोफत सुरक्षित आणि स्वच्छ सार्वजनिक स्वच्छतागृहांची मागणी त्यांनी केली. तर केवळ शौचालये बांधून त्याचे प्रश्न सुटणार नाहीत. शहरी, निमशहरी व ग्रामीण भागातील महिलांच्या स्वच्छतागृहांचे प्रश्न आणि समस्या वेगळ्या आहेत. हे आधी शासनाने समजून घेतले पाहिजे. त्यासाठी राज्यातील सर्व महिला स्वच्छतागृहांचा शासनाने सर्वे करावा आणि त्यानुसार धोरण आखावे, अशी मागणी देखील त्यांनी केली. मुंबईतील वस्ती शौचालयांची दुरवस्था, असुरक्षितता आणि देखभालीच्या मोठ्या खर्चामुळे अनेक संस्था ती चालविण्यास असमर्थ आहेत. यामुळे शासनाने त्यांचा खर्च कसा कमी होईल आणि वस्ती शौचालयांची सुरक्षा वाढवण्यासाठी पोलिसांची नियमित गस्त राहणे आवश्यक आहे. तसेच राज्यात महिलांसाठी स्वच्छ आणि आरोग्यदायी स्वच्छतागृहांची निर्मिती व्हावी, यासाठी खालील मागण्या त्यांनी सभागृहात मांडल्या. चित्रा वाघ यांनी केलेल्या मागणी अशा महामार्गांवर दर 25 किमी अंतरावर शौचालय उभारण्याचा निर्णय सभागृहात या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी महिलांसाठी मोफत व सुरक्षित सार्वजनिक स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. राज्यातल्या महामार्गांवर दर 25 किमी अंतरावर शौचालय उभारण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तेसच या स्वच्छतागृहांची देखभाल, सुरक्षा आणि स्वच्छता राखण्याची जबाबदारी सेवाभावी संस्था किंवा बचत गटांना दिली जाईल, असेही सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले.