सेंद्रिय शेतीच भविष्यात सशक्त, समृद्ध भारत बनवणार:रविराज देशमुख

प्रतिनिधी | अमरावती येणारा काळ हा सेंद्रिय शेतीचा असून सेंद्रिय शेतीच भविष्यात सशक्त व समृद्ध भारत बनवणार असल्याचे प्रतिपादन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष रविराज देशमुख यांनी केले. साऊर येथे शेतकऱ्यांसाठी दोन दिवसीय विदर्भस्तरीय जैविक कृषी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते मेळाव्याचे उद्घाटक म्हणून बोलत होते. या मेळाव्याला पोर्णिमा सवई, तालुका कृषी अधिकारी उत्कर्षा भोसले, कृषी अधिकारी प्रमोद खर्चान यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना देशमुख म्हणाले, हा कृषी मेळावा शेतकऱ्यांसाठी लाभदायी ठरणार असून या मेळाव्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, तसेच रासायनिक पद्धतीने पिकविलेल्या धान्यांपेक्षा सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले धान्यच आरोग्यासाठी चांगले आहे. शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करायला पाहीजे. समृद्ध आणि सुदृढ भारत बनवण्यासाठी ते गरजेचे आहे.