‘स्वाभिमानी’ने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर उभारली काळी गुढी:अजित पवारांचे वक्तव्य, शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात सरकारचा निषेध

‘स्वाभिमानी’ने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर उभारली काळी गुढी:अजित पवारांचे वक्तव्य, शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात सरकारचा निषेध

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शक्तिपीठ महामार्गाला विरोध म्हणून आणि अजित पवारांच्या शेतकरी कर्जमाफीवरील विधानाविरोधात आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर काळी गुढी उभारत महायुती सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत केलेली फसवणूक व कोल्हापूर सांगलीच्या जनतेवर व शेतकऱ्यांवर शक्तीपीठच्या रुपाने येणाऱ्या संकटाच्या निषेधार्थ आज सकाळी सात वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर ही काळी गुढी उभारण्यात आली. शक्तिपीठ महामार्ग हा सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी व जनतेसाठी कर्दनकाळ ठरणार आहे. शक्तीपीठ महामार्गामुळे कोल्हापूर जिल्ह्यात महापुराचा धोका वाढणार असून यामुळे शेतीसह सामान्य नागरिकांचे जीवन उद्ध्वस्त होणार आहे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने म्हटले आह. तसेच एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीआधी 100 दिवसाच्या आत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असल्याची आश्वासन दिले होते. शिवाय भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये सदर शेतकरी कर्जमाफीचा उल्लेख होता. परंतु, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा देवेंद्र फडणवीस यांनी समर्थन करून स्वतःचे व सरकारचे अपयश दाखवून दिले, त्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे, अशी टीका स्वाभिमानीच्या वतीने करण्यात आली. आजचा आनंदाचा दिवस निराशेने साजरा करतोय राज्य सरकार शक्तिपीठ महामार्गाच्या माध्यमातून आमच्यावर नांगर फिरवत आहे. दुसऱ्या बाजुला विदर्भाातील कांदा, कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकरी देशोधडीला लागलेला आहे. अशा परिस्थितीत राज्याची तिजोरी रिकामी असल्याचे सांगून शेतकरी कर्जमाफी नाकारली जात आहे. राज्य सरकारची तिजोरी शेतकऱ्यांनी लुटलेली नाही. ही तिजोरी ह्याच राज्यकर्त्यांनी वापरलेली आहे. यामुळे आम्ही आज महायुती सरकारचा निषेध व्यक्त केला आहे. राज्यभरात संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयात काळ्या गुढ्या उभ्या करून आज आम्ही आनंदाचा दिवस अतिशय निराशेने साजरा करत आहोत, असे स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले. यापुढे स्वाभिमानीच्या गुढ्या उभ्या करून, शेतकऱ्यांची एकजुट दाखवून नव्या वर्षात नवा संकल्प करूयात, असे आवाहनही स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांकडून राज्यातील शेतकऱ्यांना करण्यात आले. जाहीरनाम्यात घोषणा करताना तिरोजीची कल्पना नव्हती का? दरम्यान, अजित पवारांनी शेतकरी कर्जमाफीबाबत केलेल्या वक्तव्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी जोरदार हल्लाबोल केला. 31 तारखेपर्यंत कर्ज भरा असे शेतकऱ्यांना सांगताना लाज वाटत नाही का? महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये घोषणा करताना अजितदादा यांना तिजोरीची कल्पना नव्हती का? असा सवाल राजू शेट्टी यांनी केला. शेतकऱ्यांच्या मतासाठी पूर्णपणे गंडवले जात आहे. नेत्यांच्या कारखान्यांना थकहमी देताना तिजोरीवर भार पडत नाही का? अशीही विचारणा राजू शेट्टी यांनी केली. राज्यातील शेतकरी दररोज मरतोय त्याकडे कोण लक्ष देणार? 2029 मध्ये निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा शेतकऱ्यांना कर्जमाफीचे गाजर दाखवले जाईल, असा टोला राजू शेट्टी यांनी सरकारला लगावला.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment