आमचे कोण काय वाकडे करणार अशा मस्तीत सरकार:कृषिमंत्र्यांच्या विधानाचा वडेट्टीवारांनी घेतला समाचार, म्हणाले – त्यांच्या संवेदना संपल्या

आमचे कोण काय वाकडे करणार अशा मस्तीत सरकार:कृषिमंत्र्यांच्या विधानाचा वडेट्टीवारांनी घेतला समाचार, म्हणाले – त्यांच्या संवेदना संपल्या

राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असताना कृषिमंत्री असंवेदनशीलपणे वागत आहेत, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर केली. राज्यात विदर्भ, मराठवाड्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना फटका बसला आहे. तूर, द्राक्ष, कांदा, भाजीपाला अशा पिकांचे नुकसान झाले आहे. अशा वेळी शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी कृषिमंत्र्यांची भाषा ही असंवेदनशील आहे, अशा शब्दांत विजय वडेट्टीवार यांनी माणिकराव कोकाटेंच्या विधानाचा समाचार घेतला. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे काल नाशिकमध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांना शेतकरी कर्जमाफीबाबत विचारले असता, त्यांनी शेतकऱ्यांनाच सुनावले. कर्जमाफी मिळाल्यानंतर त्या पैशांचे काय करता? शेतीमध्ये गुंतवणूक करता का? असा सवाल माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना केला. त्यांच्या या विधानाचा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी समाचार घेत सरकारवर जोरदार टीका केली. नेमके काय म्हणाले विजय वडेट्टीवार? हाताशी आलेले पिक गेल्याने बळीराजा अडचणीत असताना त्यांना समजून घेण्याऐवजी महायुतीच्या मंत्र्यांची भाषा अरेरावीची आहे. बहुमत मिळाल्याने कोणी आमचे वाकडे करू शकणार नाही असेच या मंत्र्यांना वाटत असल्याने शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडले आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ दे, त्यांचे नुकसान होऊ दे महायुती सरकारला सामान्य जनता, शेतकऱ्यांशी देणे घेणे नाही. अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असताना अशा वेळी शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी कृषीमंत्र्यांची भाषा ही असंवेदनशील आहे. राज्यात अवकाळी पाऊस झाल्याने पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत केली पाहिजे ही आमची मागणी आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणालेत. मदतीचे नंतर बघा, पंचनाम्याची तरी तसदी घ्या गेल्या तीन-चार दिवसांत अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. साधे पंचनामे करण्याची सुद्धा गरज या सरकारला भासली नाही. तसे आदेश सुद्धा दिलेले नाहीत. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला. मदत नंतर करा, पण पंचनाम्याची तरी तसदी घ्या, अशा शब्दांत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर संताप व्यक्त केला. पंचनामे करण्याची देखील तसदी सरकार घेत नाही, इतके हे सरकार निर्ढावलेले आणि शेतकरी विरोधी सरकार खुर्चीवर बसलेले आहे. कर्जमाफीवरून शेतकऱ्यांची फसवणूक गेल्या दोन वर्षांपासून शेतकरी अनेक संकटांना सामोरे जात असताना त्याचे पैसे सुद्धा दिले नाहीत. कर्जमाफी तर दूर राहिली, त्याबाबत शेतकऱ्यांशी बेइमानी करत आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे. पण सध्या एवढे नुकसान झाले आहे, त्याचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा पाहिजे, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी सरकारकडे केली. अन्यथा या लोकांना रस्त्यावर फिरू देऊ नका, असेही आवाहन विजय वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांना केले. नेमके काय म्हणाले होते माणिकराव कोकाटे? माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांना बांधावर आले असता, अजितदादा बोलले की कर्जमाफी होणार नाही, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल का? असा प्रश्न शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांना विचारला होता. शेतकऱ्याच्या या प्रश्नाचे उत्तर देताना माणिकराव कोकाटे यांनी जे नियमितपणे कर्ज भरतात त्यांनी भरावे, असा सल्ला दिला. कर्ज घ्यायचे आणि पाच ते दहा वर्ष कर्जमाफी होण्याची वाट पाहायची. तोपर्यंत काही भरायचे नाही. समोर मीडिया उभी आहे. त्यामुळे मीडियासमोर मी जास्त बोलत नाही. पण मला एक सांगा, कर्जमाफी झाल्यानंतर तुम्हाला पैसे येतात. त्या पैशांचे तुम्ही काय करता? त्या पैशांतून शेतीमध्ये एक रुपयाची तरी गुंतवणूक आहे का? असा सवाल माणिकराव कोकाटे यांनी केला होता. आता सरकार तुम्हाला (शेतकऱ्यांना) शेतीमध्ये गुंतवण्यासाठी पैसे देणार आहे. तुम्हाला पाईपलाईनाला पैसे आहेत. सिंचनासाठी पैसे आहेत. तुम्हाला शेततळ्यासाठी पैसे आहेत. सरकार भांडवली गुंतवणूक करते. भांडवली गुंतवणूक शेतकरी करतात का? शेतकरी म्हणतात की, पीक विम्याचे पैसे पाहिजेत. मग त्यातून साखरपुडे करा, लग्न करा, असे विधान कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment