दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात लोकांचे कपडे बघून प्रवेश दिला जातो:महानगरपालिकेचा 27 कोटींचा कर बाकी, रवींद्र धंगेकरांचा गंभीर आरोप

पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकरणानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर असंवेदनशीलतेचा तसेच हलगर्जीपणाचा आरोप करण्यात आला आहे. रुग्णाच्या कुटुंबीयांना उपचारांसाठी 10 लाखांची अनामत रक्कम मागितली होती, ती न दिल्याने उपचार नाकारल्याने तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला असा आरोप रुग्णालयावर करण्यात आला आहे. यावर शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर आरोप करताना रवींद्र धंगेकर म्हणाले, मंगेशकर परिवाराचे योगदान या देशासाठी महत्त्वाचे आहे. पण मंगेशकर परिवार आणि हॉस्पिटल हा भाग वेगळा आहे. मंगेशकर कुटुंबीयांच्या नावाने सरकारने हॉस्पिटलला करोडो रुपयाची जागा मोफत दिली आहे. महानगरपालिकेचा 27 कोटींचा कर बाकी आहे. तसेच त्यांना 100 कोटींपेक्षा जास्त दंड झालेला असून तो देखील भरलेला नाही. हे सगळे कोणाच्या जिवावर चालू आहे? त्यांच्या पाठीशी कोण आहे? असा सवाल रवींद्र धंगेकर यांनी उपस्थित केला आहे. पुढे बोलताना रवींद्र धंगेकर म्हणाले, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात लाखो पेशंट येत असतात. त्या पेशंटला कशा पद्धतीने ट्रीट केले जाते? हे आपण बघितले आहे. संचालक तिथे मालक म्हणून वावरतात. त्यांना राजकीय सपोर्ट असल्याने आपले कोणीही वाकडे करू शकत नाही, या धुंदीत ते वागतात. दीनानाथ रुग्णालयात लोकांचे कपडे बघून आतमध्ये प्रवेश दिला जातो, असा खळबळजनक आरोपही रवींद्र धंगेकर यांनी यावेळी केला आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात कुठल्याही नियमाप्रमाणे वागले जात नाही. तिथे कमर्शिअल व्यवसाय होत असल्याने रुग्णाला कुठेही दिलासा मिळत नाही. शासनाने हे रुग्णालय ताब्यात घेतले पाहिजे आणि यावर प्रशासक नेमला पाहिजे, अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी केली आहे. तसेच तिथे मनमानी कारभार चालतो. जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होणार नाही, तोपर्यंत यावर काही बोलता येणार नाही. राज्य सरकारने या हॉस्पिटलला वेगवेगळ्या सुविधा दिल्या आहेत, असे रवींद्र धंगेकर म्हणाले.