मित्रांच्या मदतीने स्वतःचेच केले अपहरण:घरच्यांना मागितली 3 लाखांची खंडणी, पोलिसांच्या तपासात बनाव उघड

मित्रांच्या मदतीने स्वतःच्याच अपहरणाचा बनाव करत घरच्यांकडून खंडणी मागितल्याचा प्रकार पालघरमध्ये घडला आहे. पालघरच्या नालासोपारा येथील ही घटना असून एका 22 वर्षीय तरुणाने आपल्या अपहरणाचा बनाव करत 3 लाखांची खंडणी मागितली होती. हा बनाव पोलिसांनी उघडा पाडला असून संबंधित तरुण रोहन तिवारी आणि त्याचे दोन मित्र कौशल दुबे (21) आणि निखिल सिंग (22) यांना अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्रीच्या सुमारास रोहनच्या कुटुंबीयांना एक व्हिडिओ क्लिप मिळाली. या व्हिडिओ क्लिपमध्ये रोहनला एका अज्ञात ठिकाणी दोरीने बांधून ठेवल्याचे दिसून आले. तसेच दोन तरुण त्याला मारहाण करताना दिसले. यात रोहनच्या चेहऱ्यावर रक्त देखील दाखवण्यात आले. त्यानंतर दोन तरुणांनी रोहनच्या कुटुंबीयांना 3 लाख रुपयांची खंडणी मागितली. तसेच पैसे नाही दिले तर रोहनला मारण्याची देखील धमकी या क्लिपमधून देण्यात आली. हा व्हिडिओ पाहताच रोहनच्या काकांनी पोलिसांत धाव घेतली. आचोळे पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर नोंदवून घेतला व तपास सुरू केला. पोलिसांनी रोहनचा मोबाईल ट्रेस केला तेव्हा रोहनचे लोकेशन चेंबूर परिसरात दिसून आले. त्यानुसार येथील शिवाजीनगर पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. मात्र रोहनचे लोकेशन मिळण्यापूर्वीच रोहनचा मोबाईल बंद झाला. त्यानंतर पोलिसांच्या सांगण्यावरून रोहनच्या कुटुंबाने आरोपींना 5 हजार रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतरही रोहनचा काही संपर्क नाही झाला. दुसऱ्या दिवशी चेंबूरमधल्याच एका हॉटेलमध्ये दोन मित्र नाश्ता करण्यासाठी आले. यावेळी हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने हॉटेलमध्ये धाव घेतली व तिघांनाही ताब्यात घेतले. पोलिसांनी रोहन व त्याच्या दोन मित्रांची कसून चौकशी केली असता, रोहनने कबूल केले की आपणच अपहरणाचा बनाव केला होता. रोहनने पोलिसांसमोर आपली चूक कबूल केली. तसेच आपण हा बनाव का केला याचे देखील त्याने कारण सांगितले. व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले पैसे मिळवण्यासाठी मित्रांच्या मदतीने हा बनाव केला होता. तसेच रोहनच्या चेहऱ्यावरील जखम मेकअप करून बनवली होती, हेही पोलिसांच्या चौकशीत कबूल करण्यात आले. या संपूर्ण घटनेनंतर पोलिसांनी तिघांवर फसवणुकीचा, खंडणीचा तसेच पोलिसांची दिशाभूल केल्याच्या कलमंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.