छत्रपती संभाजीनगरात दुचाकी चोरट्याला अटक:23.40 लाखांच्या 26 दुचाकी जप्त; परभणीवरून रेल्वेने येऊन करत होता चोरी

छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी एका सक्रिय दुचाकी चोराला अटक केली आहे. परभणीतील जिंतूर तालुक्यातील शेवडी येथील एकनाथ महादू मुंडे (२७) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी रेल्वेने प्रवास करून शहरात येत असे. एमजीएम रुग्णालय आणि मिनी घाटी परिसरातील रुग्णांच्या नातेवाईकांच्या दुचाकी चोरून तो गावाकडील नातेवाईकांना कमी किमतीत विकत असे. गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मागील वर्षभरात या परिसरातून मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरी झाल्या होत्या. गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक संदीप सोळंके यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी जिंतूर बस स्थानकावरून आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी जिंतूर एमआयडीसी भागातून २६ दुचाकी जप्त केल्या आहेत. यामध्ये होंडा शाईन ७, हिरो एचएफ डिलक्स ६, स्प्लेंडर ५, ड्रीम युगा १, युनिकॉन १ आणि सुपर स्प्लेंडर १ दुचाकींचा समावेश आहे. या दुचाकींची एकूण किंमत २३ लाख ४० हजार रुपये आहे. जप्त केलेल्या दुचाकींच्या चेसीस नंबरवरून चौकशी केली असता सिडको पोलीस, एमआयडीसी सिडको आणि इंदापूर (पुणे) येथील पोलीस ठाण्यात या दुचाकी चोरीचे गुन्हे नोंदवले आहेत. आरोपीने जून २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत या दुचाकी चोरल्याचे कबूल केले आहे.