सिंहगडावर विदेशी पर्यटकासोबत टवाळखोरांचे गैरवर्तन:तरुणांनी अश्लील शिवीगाळ करायला लावली, चौघांविरोधात गुन्हा दाखल

पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर आलेल्या एका विदेशी पर्यटकाला महाराष्ट्रातील तरुणांच्या टोळक्याने अश्लील शिव्या शिकवल्या आणि त्या उच्चारायला लावल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या घटनेवरून शिवप्रेमी, नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेवर कलंक लावण्याचा प्रकार या तरुणांनी केला असल्याचे प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. व्हिडिओमधील चार तरुणांवर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 3 एप्रिल रोजी न्यूझीलंड येथील एक पर्यटक सिंहगडावर ट्रेकसाठी आला होता. त्यावेळी संभाजीनगर येथील आठ ते दहा तरुणांचा ग्रुपही ट्रेक करत होता. या ट्रेकदरम्यान एका लिंबू शरबताच्या स्टॉलसमोर हे तरुण थांबले होते. चार तरुणांनी न्यूझीलंडच्या पर्यटकाशी गप्पा मारल्या व त्याला मराठी येत नसल्याचे समजल्यावर त्याला मराठीतील गलिच्छ व अश्लील शिव्या शिकवल्या. तसेच तरुणांनी एकमेकांना अश्लील शिव्या दिल्याची नक्कल पर्यटकाकडून करवून घेतली. नंतर ”हे शब्द इतरांना जाऊन बोला.” असे त्याला सांगितले. मराठी भाषा अजिबात माहित नसल्याने तो पर्यटक हसत-हसत हे शब्द इतरांजवळ उच्चारू लागला. मात्र पुढे या पर्यटकाला काहीतरी चुकीचे शिकवले, याची जाणीव झाल्यानंतर तो तिथून निघून गेला. इथे पुन्हा येणार नाही असे त्या पर्यटकाने व्हिडिओ मध्ये उल्लेख केला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे गडकिल्ले प्रेमी, शिवप्रेमींनी याबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली. चौघांवर पोलिसांत गुन्हा दाखल या प्रकरणी चार तरुणांवर हवेली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस हवालदार संतोष भापकर यांनी या चौघांविरोधात फिर्याद दिली. दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेतर्फे हवेली पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले आहे. यावेळी इतिहास संशोधक डॉ. नंदकिशोर मते, शिवसेना ठाकरे गट विधानसभा प्रमुख नितीन वाघ, विभागप्रमुख महेश पोकळे, संघटक तानाजी गाढवे, केतन शिंदे, महेश विटे, राहुल वाळुंजकर, बाळासाहेब हणमगर, बाळासाहेब मंडलिक, अंगराज पिसे, आकाश साळुंके आदी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती सातासमुद्रापार पोहोचलेली आहे. महाराजांच्या पराक्रमाने प्रेरित होऊन अनेक परदेशी पर्यटक महाराष्ट्रातील गड-किल्ले पाहण्यासाठी येतात. अशा पाहुण्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगायचे सोडून त्यांच्यासोबत अशाप्रकारचे गैरवर्तन केले जात असेल, तर हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि ‘अतिथी देवो भव’ या मूल्यांना कलंक लावणारे आहे. या घटनेमुळे महाराष्ट्राची अस्मिता, संस्कृती याला डाग लागला असल्याचे बोलले जात आहे.