14 एप्रिलला करणार 14 वृत्तपत्रांचे वाचन:मृदगंध फाउंडेशनचा 135 शाळांमध्ये उपक्रम

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोमवार, १४ एप्रिलला मृदगंध फाउंडेशनच्या वतीने ‘१४ एप्रिल १४ वृत्तपत्र’ हे अभियान राबवण्यात येत आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी व स्थानिक, राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय स्तरावर घडणाऱ्या विविध घडामोडींची त्यांना सदैव माहिती असावी, याकरिता हे अभियान राबवण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्ताने दर्यापूर तालुक्यातील १३५ शाळांमध्ये हा उपक्रम राबवला जाईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ज्ञानाचे व अभ्यासाचे आदर्श म्हणून विद्यार्थ्यांसमोर उभे राहावे त्यातून विद्यार्थ्यांना ज्ञान लालसेची प्रेरणा मिळावी, या हेतूने मृदगंध फाउंडेशनने हा उपक्रम हाती घेतला आहे. तालुक्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी शाळांनी या उपक्रमात सहभागी होऊन बसस्थानक चौकातील वृत्तपत्र विक्रेत्यांकडून सोमवार, १४ एप्रिलला सकाळी ७ वाजता १४ वृत्तपत्र घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने त्या वृत्तपत्राचे अवलोकन करण्यास विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन मृदगंध फाउंडेशनच्या वतीने परिमल नळकांडे, गौरव पांडे, दीपक उपाध्याय, विकी नांदुरकर, विनायक चव्हाण, कुलदीप शिरभाते, धनंजय जोशी, अनिकेत तळोकार, गौरव बैताडे, गितेश गणोरकर आदींनी केले आहे.