महात्मा फुले जयंतीनिमित्त शहरातून निघाली शोभायात्रा

दरवर्षी प्रमाणे यावर्षीही राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती निमित्त भव्य रॅली शहरातून शुक्रवारी (दि.११) सायंकाळी मुधोळकर पेठ येथील विदर्भ क्षेत्रीय माळी शिक्षण संस्था येथून काढण्यात आली. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यासह विविध महापुरुषांचे देखावे आकर्षणाचे केंद्र ठरले. मुधोळकर पेठ येथून निघालेली ही शोभायात्रा गांधी चौक, राजकमल चौक, श्याम चौक, जयस्तंभ चौक, मालवीय चौक, ते महात्मा फुले चौकापर्यंत काढण्यात आली. महात्मा फुले चौकात समापन झाले. येथे महात्मा फुले यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा जयघोष करण्यात आला. रॅलीमध्ये सहभागी मान्यवरांनी महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर प्रबोधनातून प्रकाश टाकला. प्रबोधनात्मक देखावे, महात्मा फुले यांच्या प्रतिमेची मिरवणूक, १९८ गुलाब फुलांचा हार, डीजे, महापुरुषांची घोड्यावरील प्रतिकृती, फुले-सावित्रीच्या भूमिकेतील युवा वर्ग, ट्रॅक्टर मध्ये महामानवांच्या प्रतिमा, ढोल पथक, फुले यांच्या विचारांचे फलक आदींनी अमरावती करांचे लक्ष वेधले होते. या वेळी समाज बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. बाईक रॅलीमध्ये महात्मा ज्योतिराव फुले उत्सव समितीचे वासुदेव चौधरी, राजा हाडोळे, ॲड. नंदेश अंबाडकर, डॉ. गणेश खारकर, विजय धाकूलकर, प्रफुल भोजने, ओम प्रकाश अबांडकर, चेतन कांडलकर, संजय नागोणे, अरविंद अकोलकर, प्रा. रुपेश फसाटे आदी मान्यवर सहभागी झाले होते.