ढोल वाजवण्यावरुन संगमनेरच्या रथयात्रेत दोन गटात धक्काबुक्की

संगमनेर स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू असलेल्या हनुमान जयंतीच्या दिवशी महिलांनी रथ ओढण्याची परंपरा संगमनेरात उत्साहात पार पडली. मात्र मिरवणुकीमध्ये ढोल वाजवण्याच्या कारणावरून दोन गटांत धक्काबुक्की झाल्याने मिरवणुकीच्या परंपरेला गालबोट लागले. सकाळी आठ वाजता महिलांनी रथाच्या दोराला धरून हा रथ ओढला. या रथयात्रेदरम्यान काही काळ आमदार अमोल खताळ व पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या समोरच दोन गटात बाचाबाची झाली. त्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी दोन्ही गटात धक्काबुक्की देखील झाली. मात्र, पोलिसांनी वेळीच यावर नियंत्रण मिळवल्याने मिरवणूक शांततेत पार पडली. चंद्रशेखर चौक येथून सकाळी आठ वाजता सुरू झालेली मिरवणूक नगरपालिका, बाजारपेठ, तेली खुंट व चंद्रशेखर चौकामध्ये दुपारी बारा वाजता मिरवणुकीची सांगता झाली. माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्री थोरात, नीलम खताळ यांच्यासह मोठ्या संख्येने महिला मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्या होत्या. यावेळी युवकांचा उत्साह मोठ्या प्रमाणावर दिसून आला. जय श्रीरामाच्या घोषणांनी मिरवणूक लक्षवेधी ठरली.