चोरट्याचे तत्वज्ञानाने भरलेले पत्र:आपली वैयक्तिक दुश्मनी नाही, माझी परिस्थितीच बेबस; मद्यप्राशन करून झाला भावनिक

आपली काही वैयक्तिक दुश्मनी नाही, पण माझी परिस्थितीच अशी असल्यामुळे बेबस आहे. चोर चोरच असतो की त्याला बनवला जातो? पोलिस खरेच इमानदार असतात का? असा सवाल करणारे एक पत्र एका चोराने लिहिले आहे. त्याचे पत्र सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. नंदुरबार येथील तळोदा शहरातील चिनोदा चौफुलीवर बिअर बारमध्ये शुक्रवारी रात्री एक चोरटा आला त्याने मनसोक्त मद्यप्राशन केले व नंतर एक भावनिक पत्र लिहिले. या पत्रातून त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तळोदा शहराजवळच अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्य मार्गावरील हॉटेल सोनेरी परमिट रूम अँड बिअर बारमध्ये हा चोरटा बसला होता. इथे बसून त्याने मनसोक्त दारूचा आनंद लूटला. जरा किक बसल्यावर त्याने भावनिक पत्र लिहीत त्याच्या मनातील भावनांना वाट मोकळी केली आहे. काय आहे पत्रात? चोराने पत्रात स्पष्ट केले की माझी कोणाशी वैयक्तिक दुश्मनी नाही. माझी हालतच बेबस आहे. पुढे त्याने लिहिले, पोलिस खरेच इमानदार असतात का? खराखुरा चोर कोण? जो चोरतो, की जो चोर बनवतो? असा सवाल उपस्थित करत त्याने पोलिसांना देखील आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडले आहे. तसेच पैशांवर माणूस प्रेम करतो, अशी उपरोधक टीकाही या चोराने त्याच्या पत्रात केली आहे. या चोराने पत्रातून 1999 ते 2001 या काळात शहादा येथे कार्यरत असलेल्या एका पोलिस अधिकाऱ्याचा देखील पत्ता विचारला आहे. त्याने त्याच्या आयुष्याचा चित्रपटच या पत्रातून रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे. या पत्राची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. दारूच्या नशेत माणूस भावनिक होतो हे आपण ऐकतो. तसेच हा चोरटाही दारूच्या नशेत चांगलाच भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले. यावरून अनेक तर्क वितर्क देखील लावले जात आहेत. तसेच पोलिसही या भावनिक चोरचा शोध घेत आहेत.