प्रवाशांना चांगली सुविधा न देणाऱ्या हॉटेलचे थांबे रद्द करा:परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे एसटी प्रशासनाला निर्देश

प्रवाशांना चांगली सुविधा न देणाऱ्या हॉटेलचे थांबे रद्द करा:परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे एसटी प्रशासनाला निर्देश

लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान एसटी बसेस थांबत असलेल्या हॉटेल-मोटेल थांब्यावर प्रवाशांना आरोग्यदायी आणि किफायतशीर सुविधा मिळत नसतील तर असे थांबे रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत. या संदर्भात सध्या सुरू असलेल्या सर्व थांब्याचे सर्वेक्षण करून त्याचा अहवाल पुढील 15 दिवसात सादर करण्याच्या सूचना देखील त्यांनी एस. टी. महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना केल्या आहेत. लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान एसटी बसेस विविध हॉटेल-मोटेल थांब्यावर थांबतात. तेथे प्रवाशांना चहा -नाष्टा अथवा जेवण तसेच नैसर्गिक विधीसाठी वेळ दिला जातो. परंतु अनेक हॉटेलमधील थांब्या बाबत प्रवाशांच्या तक्रारी येत असून प्रामुख्याने प्रसाधनगृहे अस्वच्छ असणे, फराळाचे जिन्नस शिळे, अशुद्ध व महाग असणे, याचबरोबर संबंधित हॉटेल वरील कर्मचारी व मालकांची वर्तणूक एस. टी. प्रवासांच्या सोबत अत्यंत वाईट असणे अशा प्रकारच्या तक्रारी उद्भभवत आहेत. या तक्रारीची गंभीर दखल घेऊन मंत्री सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला याबाबत कडक धोरण स्वीकारण्याची निर्देश दिले आहेत. कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता प्रवाशांच्या आरोग्याची कोणती तडजोड न करता संबंधित हॉटेल-मोटेल थांब्यावर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी दिले आहेत. तसेच सध्या संपूर्ण राज्यभरात सुरू असलेल्या हॉटेल-मोटेल थांब्याचे नव्याने सर्वेक्षण करून तेथील प्रवासी सुविधांची चाचपणी करावी. जे थांबे प्रवाशांना योग्य सुविधा देत नसतील त्यांच्यावर कारवाई करावी व नव्या थांब्यांना मंजुरी द्यावी. तसेच याबाबतचा सविस्तर अहवाल येत्या 15 दिवसात आपल्याला सादर करावा असे निर्देशित त्यांनी दिले आहेत. सुविधा बाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही या संदर्भात सरनाईक म्हणाले की, हॉटेल – मोटेल थांबा यावरून एसटीला मिळणारे उत्पन्न एक वेळ बुडाले तर चालेल, परंतु प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधा बाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता एसटी महामंडळाच्या प्रवाशांना थांबा असलेल्या हॉटेलवर चांगल्या सुविधा मिळतील का? हे पहाणे महत्त्वाचे ठरेल.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment