सौगंध मोहम्मद की खाते है, मंदिर यही बनायेंगे:श्रीगोंदा येथील मंदिराचा जीर्णोद्धार लवकरात लवकर करावा, ह.भ.प बंडा तात्या कराडकरांची मागणी

सौगंध मोहम्मद की खाते है, मंदिर यही बनायेंगे, अशी घोषणा देत हभप बंडा तात्या कराडकर महाराजांनी अहिल्यानगरमधल्या श्रीगोंदा येथील मंदिराचा जीर्णोद्धार लवकरात लवकर करावा अशी मागणी केली आहे. तसेच या मागणीसाठी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या देखील भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. श्रीगोंदा येथे संत श्री शेख महंमद महाराज मंदिराच्या ठिकाणी दर्गा ट्रस्ट स्थापन केल्याने नवा वाद सुरू झाला असून येथील ग्रामस्थांनी आज आंदोलन सुरू केले आहे. यावेळी बंडा तात्या कराडकर महाराजांनी देखील यात सहभाग घेतला होता. या आंदोलनावेळी बोलताना बंडा तात्या कराडकर महाराज म्हणाले, सध्या श्रीगोंद्यात संत श्री शेख महाराजांचा समाधी उत्सव साजरा केला जातो, त्याठिकाणी कोणीही आपल्या समाजात विष कालवू नये. बासुंदी करण्यासाठी अनेक वस्तू लागतात. मात्र, ती बासुंदी खराब करण्यासाठी अमीन शेख सारखा एखादा खडा असतो, असे म्हणत त्यांनी शेख महाराजांचे वंशज असलेल्या अमीन शेख यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच हा खडा बाजूला करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. पुढे बोलताना बंडा तात्या कराडकर महाराज म्हणाले, श्री संत महंमद महाराज हे हिंदू मुस्लिम समाजाचे एक्याचे प्रतीक असून ते कुठल्याही एका समाजाचे नाहीत. संत महंमद महाराज यांची जुनी परंपरा आहे, या ऐक्यात एक समाजकंटक मिठाचा खडा टाकत आहे, हे वारकरी समाज कधीही सहन करणार नाही. शासनाने कुठलाही विलंब न करता चुकीचा ट्रस्ट रद्द करावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. तसेच मी याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. आम्हाला बेमुदत धरणे आंदोलन करण्याची वेळ आणू नका, अशी विनंती मी मुख्यमंत्र्यांकडे करेल. तसेच लवकरात लवकर मंदिर जीर्णोद्धार करावा, अशी देखील विनंती बंडा तात्या महाराजांनी ग्रामस्थांकडे केली आहे. नेमके प्रकरण काय? श्री संत शेख महंमद शेख महाराज हे संत तुकाराम महाराज यांच्याच काळातील एक संत होते. मुस्लिम कुटुंबात जन्माला आले असले तरी संत शेख महंमद यांनी भागवत धर्म स्वीकारला. इतकेच नव्हे तर त्यांनी भागवत धर्माचा प्रचार प्रसार देखील केला. श्रीगोंदा शहरात त्यांची संजीवनी समाधी आहे. मात्र, यता समाधीच्या ठिकाणी मंदिर उभे राहावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. तर दुसरीकडे शेख महाराज यांचे वंशज अमीन शेख यांनी मंदिर परिसरात सुफी संत शेख महंमद बाबा दर्गाह” नावाने ट्रस्ट सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे. त्यावरुन, हे वाद निर्माण झाला आहे.