चंद्रकांत खैरेंबद्दल प्रश्न विचारताच अंबादास दानवे संतापले:म्हणाले- आम्ही आमच्या पक्षाला पाहण्यास सक्षम आहोत, कृपया काड्या करणे बंद करा

छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटात माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यात मतभेद असल्याची चर्चा सुरू होती. त्यात अंबादास दानवे यांच्यावर नाराजी व्यक्त करत चंद्रकांत खैरे यांनी थेट मातोश्री गाठत उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. त्यानंतर हा वाद मिटला असल्याचे स्पष्टीकरण देखील खैरे यांनी दिले होते. मात्र, अद्यापही या दोघांमध्ये आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. अंबादास दानवे यांना खैरे यांच्याविषयी प्रश्न विचारताच त्यांनी संताप व्यक्त केल्याचे दिसून आले आहे. आम्ही आमच्या पक्षाला पाहण्यास सक्षम आहोत, कृपया काड्या करणे बंद करा, असे उत्तर दानवे यांनी दिले. अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेला चंद्रकांत खैरे का उपस्थित नाहीत, असा प्रश्न पत्रकारांनी विचारताच दानवे यांनी संताप व्यक्त केला. यावर उत्तर देताना दानवे म्हणाले, मला वाटते तुम्ही काड्या करणे बंद करा. मी स्पष्टपणे सांगतो. ही शिवसेना नेत्यांची बैठक आहे. काल-परवा खैरे साहेबांनी सांगितलेले आहे. मी तर काहीही बोललो नाही. काड्या करणे बंद करावे. मी हात जोडून विनंती करतो. आम्ही आमच्या पक्षाला पाहण्यास सक्षम आहोत. तसेच बातम्या छपायच्या असतील तर छापाव्या नाहीतर छापू नयेत. एवढे स्पष्टपणे मी सांगत आहे. आम्ही माहिती द्यायला आलो आहोत, असे दानवे म्हणाले. दरम्यान, मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर चंद्रकांत खैरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना चंद्रकांत खैरे म्हणाले, उद्धव ठाकरे यांची भेट झाली असून कार्यक्रमासंदर्भात चर्चा झाली आहे. काही कार्यक्रम पक्षाकडून आखले जाणार आहेत, त्याबाबत त्यांच्याशी बोलणे झाले. तसेच पुढे बोलताना चंद्रकांत खैरे म्हणाले, अंबादास दानवे आणि माझा वाद केव्हाच मिटला आहे. यापुढे आम्ही दोघे मिळून एकत्र कार्यक्रम करणार आहोत. तो एकटा किंवा मी एकटा कार्यक्रम करणार नाही, सोबत म्हणून कार्यक्रम करणार आहोत. ..म्हणून मेळाव्याला जाऊ शकलो नाही चंद्रकांत खैरे पुढे म्हणाले, संभाजीनगरमधील मेळाव्याच्या कार्यक्रमाला मला निमंत्रण नव्हतं. शिवाय त्या मेळाव्याच्या दिवशी माझ्या समाजाचा कार्यक्रम आधीपासून ठरलेला होता, त्यासाठी मी तिकडे गेलो होतो. त्यामुळे मेळाव्याला जाऊ शकलो नाही. उद्धव ठाकरेंना मी सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि आता वाद मिटलेला आहे. तसेच 15 जूनला उद्धव ठाकरे संभाजीनगर येथे शिवसेना भवनचे उद्घाटन करतील तसेच शिबिर सुद्धा घेतील, अशी माहिती चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे.