रिकाम्या हंड्यांचे तोरण बांधत ‘लबाडांनो पाणी द्या’ आंदोलनाला सुरुवात:संभाजीनगरातील पाणी प्रश्नावर ठाकरे गट आक्रमक

संभाजीनगरातील मुकुंदवाडी चौक कमान येथे रिकाम्या हंड्यांचे तोरण बांधत “लबाडांनो पाणी द्या” या जन आंदोलनाची आज ठाकरे गटाच्या वतीने सुरुवात करण्यात आली. संभाजीनगर महानगरपालिकेची 240 एमएलडी पाण्याची आवश्यकता असून दररोज 140 एमएलडी पाण्याचा पुरवठा केला जातो. अशी स्थिती असताना शहराला दोन अथवा तीन दिवसाला पाणी मिळायला पाहिजे, मात्र11 ते 12 दिवसाला शहराला पाणी मिळत असून ही पुरवठा व्यवस्था सुरळीत होण्याची मागणी या वेळी करण्यात आली. जनसामान्याच्या हक्कासाठी आमचा पक्ष रस्त्यावर उतरला असून संभाजीनगर शहराला पाणी मिळवून देण्यासाठी एल्गार पुकारला असल्याचे या वेळी विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. पुढील एक महिन्यात दररोज वेगवेगळ्या प्रकारच्या आंदोलन करून जनसामान्यांचा हा प्रश्न शासन आणि प्रशासन स्तरावर पोहोचवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेले पाणी योजनेचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. ऐन उन्हाळ्यात 10 दिवसांनंतर येत आहे. सर्वसामान्यांना पाणी मिळवण्यासाठी प्रचंड कसरत करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव सेनेने सलग महिनाभर ‘लबाडांनो पाणी द्या’ या आंदोलनाची घोषणा केली. त्यानुसार आज मुकुंदवाडी भागात हे आंदोलन करण्यात आले. दहाव्या दिवशी देखील पाणी येत नसल्याचा आरोप आमच्या काळात किमान दुसऱ्या दिवशी पाणी यायचे, आता दहाव्या दिवशी देखील पाणी येत नसल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. या आंदोलनादरम्यान रिकाम्या हंड्यांचे तोरण, नागरिक बैठक, सह्यांची मोहीम, ढोल बजाव आंदोलन, सायकल रॅली, महाविद्यालयीन युवकांशी संवाद, दवंडी देणे, छायाचित्र प्रदर्शन, वार्ड पदयात्रा, कट्टा मीटिंग व जॅकवेलची पाहणी आदींचा आंदोलनात समावेश करण्यात येणार आहे.