साहेब तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेत जीवन संपवले:छेडछाडीतून तरुणीची आत्महत्या, बीड प्रकरणातील पीडित मुलीच्या आईचे एकनाथ शिंदेंना पत्र

साहेब तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेत जीवन संपवले:छेडछाडीतून तरुणीची आत्महत्या, बीड प्रकरणातील पीडित मुलीच्या आईचे एकनाथ शिंदेंना पत्र

बीडमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. एका तरुणीने छेडछाड आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. साक्षी कांबळे असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. 14 मार्च रोजी मामाच्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. एक महिना उलटून गेला असून कुटुंब अद्यापही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यात आता साक्षीच्या आईने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहिले आहे. एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या पत्रात साक्षी कांबळे यांच्या आई म्हणतात, साहेब, मी तुमची लाडकी बहीण. तुम्ही मुख्यमंत्री झाला आणि राज्यातील अस्वस्थ झालेल्या बहि‍णींना आधार मिळाला. आपण मुख्यमंत्री असताना आपल्या म्हणजेच आम्हासारख्या अगणित बहि‍णींना भावाचा बंध मिळाला. मी नाराज आहे. आज आपण उपमुख्यमंत्री आहात. मात्र माझ्यासाठी तुम्हीच लाडक्या बहिणीचे मुख्यमंत्री आहात. आज आम्हाला तुमची कमतरता भासते, असे त्यांनी सुरुवातीला म्हटले आहे. पुढे त्या म्हणतात, माझी मुलगी साक्षी तिला हवाई सुंदरी व्हायचे होते. मात्र एका क्षणात ती नाहीशी झाली. काही मुलांनी तिची छेड काढली आणि साहेब तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेऊन जीवन संपवले. साहेब आम्ही आस धरुन आहोत. तुमची भाची साक्षी या जगात परत येणार नाही, हे आम्हाला देखील माहिती आहे. मात्र त्या क्रूर नराधमांना देखील तेवढी शिक्षा होणे अपेक्षित आहे. नेमके प्रकरण काय? साक्षी कांबळे यांच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, 20 एप्रिल रोजी मुलीचे लग्न होणार होते. पण त्याआधीच छेडछाडीला कंटाळून माझ्या मुलीने आत्महत्या केली. अभिषेक कदम आणि 10 ते 12 मुलांची एक टोळी आहे. ही टोळी मुलींना फसवतात, त्यांचे फोटो काढून ब्लॅकमेल करतात. हे एक रॅकेट आहे. यात दोन मुलींचाही समावेश असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अभिषेक कदमवर मकोका लावावा आणि कायमचा जेलमध्ये टाकावा, अशी मागणी पीडितेच्या आईने केली आहे. दरम्यान, या घटनेवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. अंबादास दानवे म्हणाले, राजकीय दबावाला पोलिसांनी बळी पडू नये. बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये. पोलिसांनी कडक कारवाई करावी. मुलींची छेडछाड असेल तर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, असे दानवे यांनी म्हटले आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment