प्राध्यापकाची आत्महत्या नसून हत्या:किरीट सोमय्यांवर खळबळजनक आरोप, वृद्ध आंदोलकाचे मंत्रालयासमोर आंदोलन

अलिबाग येथे प्राध्यापक अविनाश ओक यांनी आत्महत्या केली होती. त्यांना न्याय मिळावा यासाठी आज मुंबई येथील मंत्रालयाच्या बाहेर एका सामाजिक कार्यकर्त्याने आंदोलन केले. प्राध्यापक अविनाश ओक यांच्या आत्महत्येला भाजप नेते किरीट सोमय्या जबाबदार असल्याचा आरोप आंदोलनकर्ते आशिष करंदीकर यांनी केला आहे. तसेच सोमय्या यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी करंदीकर यांनी केली आहे. दरम्यान, पोलिसांनी करंदीकर यांना ताब्यात घेतले आहे. मुंबई येथील मंत्रालयाच्या समोर हातात किरीट सोमाय्या यांचा फोटो असलेला मोठा फलक घेत त्यावर देवेंद्र फडणवीस राजीनामा देणार का, असा सवालही आशिष करंदीकर यांनी केला आहे. यावेळी मंत्रालयाच्या बाहेर आंदोलन करणाऱ्या आशिष करंदीकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आशिष करंदीकर म्हणाले, आपण किरीट सोमय्या यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. खून, खंडणी, अपहरणाचे सगळे गुन्हे आहेत. परंतु, पोलिस सिव्हिल मॅटर म्हणून हे गुन्हे दाखल करत आहेत. कारण पोलिसांवर किरीट सोमय्या यांचा दबाव आहे. त्यामुळे पोलिस कुठलीही कारवाई करत नाहीत. हे दुसरे बीड प्रकरण आहे, त्यामुळे 6 महिन्यानंतर आता मी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे, असे आशिष करंदीकर म्हणाले आहेत. दरम्यान, मंत्रालयाच्या बाहेर आंदोलन करत असताना पोलिसांनी करंदीकर यांना ताब्यात घेतले आहे. यावेळी ते म्हणाले की, संविधानाकडून मिळालेला बोलण्याचा अधिकार देखील हिरावून घेतला जात आहे. प्राध्यापक अविनाश ओक यांनी 5 मार्च रोजी आत्महत्या केली होती. अविनाश ओक हे अलिबाग येथील जे.एस.एम कॉलेजचे निवृत प्राध्यापक आणि जनशिक्षण संस्था रायगडचे अध्यक्ष होते. पेण रेल्वे स्टेशन येथे धावत्या रेल्वे समोर उडी घेत त्यांनी आत्महत्या केली होती. या घटनेनंतर भाजप नेते किरीट सोमय्या हे तातडीने पेण येथे दाखल झाले होते. किरीट सोमय्या हे अविनाश ओक यांचे चुलत मेहुणे असल्याची माहिती आहे. कोण आहेत अविनाश मनोहर ओक? अविनाश ओक हे रायगड येथील माणगावचे रहिवासी होते. कामानिमित्त ते अलिबाग येथे स्थायिक झाले होते. त्यांचे वडील मनोहर ओक हे प्रसिद्ध वकील होते. अलिबाग येथील जे.एस.एम कॉलेज येथे राज्यशास्त्र या विषयाचे ते प्राध्यापक होते. याच दरम्यान त्यांनी रायगडच्या जनशिक्षण संस्थेचे अध्यक्ष पद भूषविले होते. त्यांच्या पत्नी अलिबाग येथील कमळ नागरी संस्थेच्या संचालिक आहेत. प्राध्यापक अविनाश ओक यांचा सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रात मोठे कार्य होते.