महाराष्ट्रातील मृतकांचे पार्थिव मुंबई विमानतळावर दाखल:कुटुंबीयांना अश्रू अनावर, पनवेलच्या दिलीप देसले यांच्या अंत्यसंस्कारासाठी दादा भुसे उपस्थित

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात आता त्यांचे मृतदेह आणण्यात येत आहेत. यातील मृतक दिलीप देसले यांचे मृतदेह पनवेल येथे त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. यावेळी कुटुंबीयांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. याचसोबत डोंबिवली येथील संजय लेले यांचे पार्थिव देखील महाराष्ट्रात आणण्यात आले आहे. यावेळी मंत्री आशिष शेलार तसेच भाजपचे नेते रवींद्र चव्हाण उपस्थित होते. मुंबईच्या विमानतळावर मृतदेह आणण्यात येत आहेत. डोंबिवली येथील संजय लेले आणि पनवेल येथील दिलीप देसले यांचे पार्थिव मुंबई विमानतळावर आणण्यात आले. महाराष्ट्र सरकारतर्फे त्यांच्या नातेवाईकांची विमानतळावर भेट घेऊन सांत्वन केले. तसेच दिलीप देसले आणि संजय लेले यांच्या पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली, अशी माहिती आशिष शेलार यांनी दिली आहे. पनवेल येथील मृतक दिलीप देसले यांच्या निवासस्थानी मोठा पोलिस बंदोबस्त करण्यात आला होता. तसेच या ठिकाणी आता शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे दिलीप देसले यांच्या अंत्यविधीसाठी दाखल झाले होते. दरम्यान, डोंबिवली येथील मृतक संजय लेले, अतुल मोने व हेमंत जोशी यांचे पार्थिव डोंबिवलीत दाखल करण्यात येणार आहे. हे तिघेही मित्र होते. डोंबिवलीकरांना त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेता यावे, यासाठी त्यांचे पार्थिव सायंकाळी 7 वाजता भागशाळा मैदान येथे आणण्यात येणार आहे, अशी माहिती भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे. आम्ही ही बातमी अपडेट करत आहोत