समृद्धी महामार्गावर कारची ट्रकला जोरदार धडक:शनिशिंगणापूरला दर्शनासाठी निघालेल्या तरुणाचा मृत्यू, दोघे जखमी

वाशीम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यात समृद्धी महामार्गावर दिनांक २६ एप्रिल रोजी सकाळी भीषण अपघात झाला. नागपूरहून शनिशिंगणापूर येथे जाणाऱ्या एका भरधाव फॉर्च्युनर कारने समोर चालणाऱ्या ट्रकच्या मागच्या बाजूला जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील एका २८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कारमधील तरुण हे शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी समृद्धी महामार्गाने निघाले होते. परंतू वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला. मंगरूळपीर तालुक्यातील लोकेशन २०७ वर आल्यानंतर कारची समोरील ट्रकला जोराची धडक दिली. या अपघातात श्रीजित राऊत या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तो नागपूरचा रहिवासी आहे. तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. कारचा समोरील भाग चक्काचूर जखमी झालेल्या दोघांना तातडीने कारंजा येथील उप जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. धडक इतकी जोरदार होती की, फॉर्च्युनर कारचा समोरील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. अपघातानंतर घटनास्थळी प्रचंड गोंधळ उडाला होता. अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्गाचे मदत पथक घटनास्थळी दाखल होऊन जखमींना मदत केली.