घराच्या छतावर झोपणं पडलं महागात:घर फोडून दुचाकी वाहनासह 1 लाखांचा ऐवज पळविला, कवरदरीमधील घटनेप्रकरणी गुन्हा दाखल

सेनगाव तालुक्यातील कवरदरीमध्ये घराच्या छतावर झोपण्यासाठी गेलेल्या कुटुंबाचे घर फोडून चोरट्यांनी दागिन्यांसह रोख रक्कम व दुचाकी वाहन पळविल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात शनिवारी ता. 26 गुन्हा दाखल झाला आहे. चोरट्यांनी दुचाकी वाहनातील कागदपत्रे जिंतूर रोडवरील चिंचखेडा फाट्यावर एका झाडाला लटकून ठेवल्याचे दिसून आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील कवरदरी येथे गुलाब कुंदर्गे यांचे घर आहे. सध्या वाढत्या उष्णतेमुळे रात्रीच्या वेळीही उष्णतेचा त्रास होत असल्याने कुंदर्गे कुटुंबिय शुक्रवारी ता. 25 रात्री जेवण करून घराच्या छतावर झोपण्यासाठी गेले होते. शनिवारी पहाटे एक ते तीन वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलुप तोडून आता प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी घरातील साहित्याची नासधुस केली. त्यानंतर घराच्या कपाटात ठेवलेले एक तोळे वजनाची सोन्याची एकदानी, एक सोन्याचे कानातील झुंबर जोड व 35 हजार रुपये रोख चोरट्यांनी ताब्यात घेतले. त्यानंतर घरासमोर उभी केलेले दुचाकी वाहन घेऊन चोरट्यांनी पळ काढला. दरम्यान, शनिवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास कुंदर्गे कुटूुंबिय जागे झाल्यानंतर त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यामुळे त्यांनी घरात जाऊन पाहणी केली असता घरातील साहित्य अस्ताव्यस्त झालेले दिसून आले. चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सेनगाव पोलिस ठाण्यात माहिती दिली. पोलिस निरीक्षक शालीनी नाईक, जमादार टी. के. वंजारे, सुभाष चव्हाण, गायकवाड यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी गुलाब कुंदर्गे यांच्या तक्रारीवरून सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, चोरट्यांनी दुचाकी वाहनातील कागदपत्रे सेनगाव ते जिंतूर मार्गावर चिंचखेडा फाट्यावर एका झाडाला लटकवून ठेवले. एका शेतकऱ्याने कागदपत्रांची पाहणी करून त्यावर असलेल्या मोबाईलवर संपर्क साधल्यानंतर कागदपत्रे कुंदर्गे यांच्या वाहनाचेच असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे चोरटे जिंतूर मार्गे गेल्याचे स्पष्ट झाले आहे.