पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या, देत नसतील तर युद्ध करा:त्याच मार्गाने दहशतवादी भारतात येतात, रामदास आठवले यांची मागणी

पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या, देत नसतील तर युद्ध करा:त्याच मार्गाने दहशतवादी भारतात येतात, रामदास आठवले यांची मागणी

पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या, देत नसतील तर युद्ध करा, असे विधान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. लोणावळा येथे विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी ते आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यावर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. रामदास आठवले म्हणाले, जोपर्यंत पाकव्याप्त काश्मीर आहे, तोपर्यंत दहशतवादी कारवाया सुरूच राहणार आहेत, याकरिता माझी भारत सरकारला व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे, की पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या व देत नसतील तर पाकिस्तानच्या विरोधात युद्ध पुकारा. पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला निंदनीय आहे. त्याच मार्गाने दहशतवादी भारतात येतात. त्यामुळे तो भाग भारतात घेणे आवश्यक आहे. पाकिस्तानने देखील तो भाग सोडावा, नाहीतर आम्ही युद्ध केल्याशिवाय राहणार नाही, आमचे सरकार याविषयी गंभीर आहे, विरोधकांनी आम्हाला साथ द्यायला पाहिजे, असे आठवले म्हणाले आहेत. दरम्यान, लोणावळा शहरातील विविध विकास कामांचा आढावा रामदास आठवले यांनी घेतला. यावेळी येथील पर्यटन विकासाला चालना देणाऱ्या प्रकल्पांना निधी देण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले आहे. दरम्यान, सध्या पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारकडून ठोस पाऊले उचलली जात आहेत. तसेच जम्मू काश्मीरमध्ये सर्च ऑपरेशन देखील सुरू करण्यात आले आहे. भारताने पाकिस्तानची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सिंधू नदीच्या पाणी वाटप कराराला स्थगिती देण्यात आली आहे. तसेच अटारी बॉर्डर देखील बंद करण्यात आली आहे. पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले असून, त्यांना देश सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता पाकिस्तानवर चांगलाच दबाव वाढला आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment