मित्रपक्षांविरोधात आक्षेपार्ह टिपण्ण्या टाळा:पक्षाच्या विजयासाठी सर्वांनी एकसंघ राहून काम करा, एकनाथ शिंदेंच्या शिवसैनिकांना सूचना

मित्रपक्षांविरोधात आक्षेपार्ह टिपण्ण्या टाळा:पक्षाच्या विजयासाठी सर्वांनी एकसंघ राहून काम करा, एकनाथ शिंदेंच्या शिवसैनिकांना सूचना

राज्यात विधानसभा निवडणुका शांततेत पार पडल्यानंतर आता साऱ्या राजकीय पक्षांचे लक्ष महापालिका निवडणुकांकडे वळले आहे. आगामी काही महिन्यांत महापालिका निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात असून, राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विशेषतः मुंबई महापालिकेसह इतर प्रमुख महापालिकांवर सत्ता मिळवण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षातील नेत्यांना सूचना दिल्या आहेत. मित्रपक्षांविरोधात आक्षेपार्ह टिपण्ण्या टाळा, अशा स्पष्ट सूचनाच शिंदेंनी दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षातील नेत्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत, निवडणूकपूर्व चर्चा, जागावाटप किंवा युतीतील समन्वयाच्या प्रक्रियेपूर्वी कोणत्याही मित्रपक्षाविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करू नये. दरम्यान, सर्वच पक्षांत अंतर्गत रणनीती आखली जात असून, उमेदवारांची चाचपणी आणि मतदारसंघनिहाय समीकरणांवर बैठका सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत चुरस पाहायला मिळणार, हे निश्चित आहे. युतीतील जागा वाटपाचा निर्णय महायुतीतील तीन प्रमुख नेते घेतील आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाने तयारीचा धडाका सुरू केला असून, पक्षातील नेत्यांना संयम बाळगण्याचा कानमंत्र खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. मुंबईतील माजी नगरसेवकांच्या बैठकीत बुधवारी बोलताना शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, युतीतील जागा वाटपाचा निर्णय महायुतीतील तीन प्रमुख नेते घेतील आणि त्यावर इतरांनी कोणतीही जाहीर टिप्पणी करू नये. मित्रपक्षांविरोधात आक्षेपार्ह टिपण्ण्या टाळा मित्रपक्षांशी संबंध ताणले जाऊ नयेत, एकमेकांवर कुरघोडी होऊ नये, यासाठी उत्तराला प्रतिउत्तर देताना भाषेची आणि शब्दांची विशेष काळजी घेण्याच्या सूचनाही शिंदे यांनी दिल्या. मित्रपक्षांविरोधात आक्षेपार्ह टिपण्ण्या टाळा, असा इशाराच त्यांनी आपल्या नेत्यांना दिला. महापालिका निवडणूक ही प्रतिष्ठेची असून, पक्षाच्या विजयासाठी सर्वांनी एकसंघ राहून काम केले पाहिजे, असेही शिंदे यांनी यावेळी ठणकावून सांगितले. मंत्र्यांवरही विशेष जबाबदारी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेच्या मंत्र्यांवर देखील विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांना मुंबईतील विविध विभागांच्या नियोजनासोबतच मुंबईत वास्तव्यास असलेल्या मतदार संघातील नागरिकांचे मेळावे घेऊन एक संघठीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर कोणीही मित्रपक्षांबद्दल, जागावाटपाबाबत किंवा युतीतील मित्रपक्षाविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करण्याचे टाळण्याबाबत शिंदेंनी सूचना दिल्या आहेत. या बैठकीत सूचना देताना एकनाथ शिंदे म्हणाले, विविध राजकीय पक्षांतून शिवसेना पक्षात सामील झालेल्या मुंबईतील माजी नगरसेवकांसोबत आज संवाद साधला. आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांना तयारीला लागण्याचे निर्देश याप्रसंगी दिले. महायुतीचे सरकार अस्तित्वात आल्यावर गेल्या अडीच वर्षात केलेली रस्ते काँक्रीटीकरणाची कामे, एसटीपी उभारणीची कामे, सुशोभीकरणाची कामे, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, आरोग्य सुविधा वाढवण्याची कामे असतील, कोस्टल रोड, मेट्रोची अशा अनेक लोकोपयोगी कामांची माहिती त्यांना दिली. ही सर्व कामे या माजी नगरसेवकांना समजावून सांगितली आणि ती कामे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवावी असे आवाहन याप्रसंगी केले, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या एक्स या माध्यमावर दिली आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment