भुजबळांना मंत्रिपदानंतर खातेही मुंडे यांचेच:अन्न व पुरवठा विभागाची जबाबदारी; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा अखेर सरकारमध्ये प्रवेश झाला आहे. त्यांनी मंगळवारी सकाळी राजभवनात आयोजित एका छोटेखानी समारंभात कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओबीसींचे बडे नेते असणाऱ्या भुजबळांचा मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. त्याचा पक्षाला मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. आता त्यांच्याकडे धनंजय मुंडे यांच्याकडे असलेली अन्न व पुरवठा विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसने एका ओबीसी मंत्र्यांच्या बदल्यात दुसरा ओबीसी नेत्याला मंत्रिमंडळात स्थान देऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरु केली असल्याचेही बोलले जात आहे. विशेष म्हणजे भुजबळ यांच्याकडे या आधी देखील अन्न व पुरवठा विभागाचा पदभार होता. ज्याचा शेवट चांगला, त्याचे सर्व चांगले. आतापर्यंत मी प्रत्येक जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडली आहे. आताही मला जी काही जबाबदारी मिळेल ती मी नेटाने पार पाडणार असल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे. 77 वर्षीय भुजबळ यांनी महाराष्ट्र मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते धनंजय मुंडे यांची जागा घेतली आहे. मुंडे यांनी आरोग्याच्या कारणास्तव मार्चमध्ये अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, त्याला संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि त्यात वाल्मीक कराडची भूमिका याचीही किनार होती. त्यानंतर आता मंत्रिमंडळात नव्याने दाखल झालेले भुजबळ यांना मुंडे यांच्याकडील खाते देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत…