वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात नवा खुलासा:हुंड्यात मिळालेले 51 तोळे सोने हगवणे कुटुंबीयांनी बँकेत गहाण ठेवले, तपासात स्पष्ट

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात अनेक धक्कादायक बाबी आता समोर येत आहेत. वैष्णवी हिला मोठ्या प्रमाणात हुंडा देण्यात आला होता. मात्र यातील 51 तोळे सोने हगवणे कुटुंबीयांनी बँकेमध्ये गहाण ठेवले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 51 तोळे सोने कुटुंबाकडून फेडरल बँकेत गहाण ठेवण्यात आले आहे. वास्तविक वैष्णवी आणि शशांक यांचा प्रेम विवाह झाला होता. तरी देखील वैष्णवीला लग्नामध्ये तिच्या माहेरच्या मंडळींकडून 51 तोळे सोने, चांदीची भांडी, फार्च्युनर गाडी अशा बऱ्याच गोष्टी हुंडा म्हणून देण्यात आल्या होत्या. इतकेच नाही तर सात किलो चांदीची भांडी वैष्णवीला हुंड्यात देण्यात आली होती. एवढे सगळे मिळून देखील हगवणे कुटुंबांना अजून पैशांची अपेक्षा होती. त्यामुळेच त्यांनी वैष्णवीच्या वडिलांकडे दोन कोटी रुपयांची मागणी केली होती. पैसे न मिळाल्याने त्यांनी वैष्णवीचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरु केला होता. त्यातच आता लग्नामध्ये मिळालेले 51 तोळे सोने त्यांनी बँकेत गहाण ठेवले असल्याची माहिती समोर आली आहे. वैष्णवीचे 51 तोळे सोने हे कोणत्या कारणासाठी बँकेत गहाण ठेवण्यात आले? त्यासाठी वैष्णवीने परवानगी दिली होती का? तसेच सोने गहाण ठेवण्यासाठी तिचा छळ करण्यात आला होता का? सोने तारण ठेवण्यामागचा नेमका उद्देश काय होता? असे अनेक प्रश्न या निमित्ताने आता पुन्हा एकदा उपस्थित होत आहेत. आता या सर्वांचा तपास पोलिसांच्या वतीने सुरू करण्यात आला आहे. लग्नाच्या वेळी हुंडा म्हणून देण्यात आलेली फार्च्युनर कार आणि ॲक्टिवा गाडी देखील पोलिसांनी जप्त केली आहे. हुंड्यात घेतले 51 तोळे सोनं अन् फार्च्युनर मिळालेल्या माहितीनुसार शशांक आणि वैष्णवीच्या लग्नाच्या वेळी तिच्या माहेरच्यांनी 51 तोळे सोनं, फार्च्युनर कार आणि चांदीची भांडी दिली होती. मात्र जमीन खरेदीसाठी दोन कोटी रुपये घेऊन ये या मागणीसाठी सासरचे लोकं तिचा छळ करत होते. तर शशांक तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता, या सर्व गोष्टीला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे समजते. याप्रकरणी वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे, सासू, पती, दिर आणि नणंद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.