धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी राजीनामा देईन:त्यांना मंत्रिमंडळात घ्यायचे ठरले तर माझी काही हरकत नाही, छगन भुजबळांचे मोठे विधान

उद्या जर धनंजय मुंडे यांना क्लीनचिट मिळाली तर आपण मंत्रिपदाचा राजीनामा देऊ, असे विधान मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात नव्यानेच छगन भुजबळ यांच्याकडे मंत्रिपद देण्यात आले आहे. तसेच कॉंग्रेस जेव्हा फुटली तेव्हा मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर होती, पण मी शरद पवारांसोबत गेलो, असेही भुजबळ यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना छगन भुजबळ यांना प्रश्न विचारण्यात आला की धनंजय मुंडे पुन्हा मंत्रिमंडळात आले तर तुम्ही काय करणार? यावर उत्तर देताना भुजबळ म्हणाले, उद्या जर धनंजय मुंडे यांना क्लीनचिट मिळाली तर आपण मंत्रिपदाचा राजीनामा देऊ. धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात घ्यायचे ठरले तर माझी काही हरकत नाही. मी या मंत्रिमंडळात पुन्हा आलो आहे, सन्मानाने मला परत बोलावले. धनंजय मुंडे सगळ्यातून मुक्त झाले, त्यांची सगळी लाईन क्लियर झाली तर मी राजीनामा देईन. अजित पवारांशी अबोला धरला होता पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले, जेव्हा मंत्रिपद मिळाले नव्हते तेव्हा अनेक विचार येत होते आणि खंत वाटत होती. मी आणि अजितदादा बोलत नव्हतो. अजितदादांच्या घरच्या कार्यक्रमाला गेलो नाही. पण मी पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात मी उपस्थित राहिलो, असे म्हणत भुजबळ यांनी अजित पवारांशी अबोला धरला होता असे कबूल केले आहे. भाजपसोबत जायचे आधीच ठरले होते छगन भुजबळ म्हणाले, शरद पवारांनी जेव्हा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तेव्हा सुप्रियाला पक्षाचे अध्यक्ष करायचे, सरकारमध्ये जायचे असे ठरले होते. यामध्ये पवार साहेब कुठेच असणार नाहीत असेही ठरले होते. युतीची सर्व चर्चा करायला जयंत पाटील, अजित पवार आणि प्रफुल पटेल जात होते. भाजपबरोबर जावे यासाठी आमच्या अनेक बैठका झाल्या. त्यामध्ये अनिल देशमुखही होते. छगन भुजबळ यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदनमध्ये भ्रष्टाचार केल्याप्रकरणी तुरुंगात जावे लागले होते. यावर प्रश्न विचारला असता ते म्हणाले, महाराष्ट्र सदनमध्ये भ्रष्टाचार झाला नाही. महाराष्ट्र सदनाचा एकही रुपया अजूनही कंत्राटदाराला मिळाला नाही. मग भ्रष्टाचार कसा झाला? असा सवाल भुजबळ यांनी उपस्थित केला.