वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरण:राजेंद्र हगवणे याला मदत करणाऱ्या पाच जणांना जामीन मंजूर; माजी मंत्र्यांचा मुलगा आणि फार्म हाऊस मालकाचाही समावेश

वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणातील आरोपी राजेंद्र हगवणे याला मदत करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये कर्नाटकचे माजी ऊर्जामंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम पाटील, मावळ मधील फार्म हाऊसचे मालक बंडू फाटक, साताऱ्यातील पुसेगाव येथील राहुल जाधव, अमोल जाधव तर तळेगाव दाभाडे येथील मोहन भेगडे यांचा समावेश आहे. या सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र गुन्हा जामीन पात्र असल्यामुळे त्यांना न्यायालयाने जामीन दिला आहे. आता त्यांची 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत पाच जणांना अटक केली होती. या पाच जणांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी राजेंद्र हगवणे व त्याचा मुलगा सुशील हगवणे यांना फरार राहण्यासाठी मदत केली होती. अटक करण्यात आलेल्यांमध्ये कर्नाटकातील माजी मंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा प्रितम पाटील याचाही समावेश होता. अटक केलेल्या पाचही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. सर्व आरोपी सध्या पोलिस कोठडीत वैष्णवी हगवणे हिने हुंड्यासाठी सासरच्यांकडून होणाऱ्या अत्याचार व मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केली होती. या प्रकरणी तिचा पती, सासू आणि नणंद यांना पोलिसांनी सुरुवातीलाच अटक केली होती. तर सासरा राजेंद्र हगवणे व दीर सुशील हगवणे हे दोघेही 17 मेपासून फरार होते. 22 मे रोजी पहाटे पोलिसांनी त्यांना अटक केली. सर्व आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहेत. आरोपींना मदत करणाऱ्या पाच जणांना केली होती अटक आरोपी राजेंद्र आणि सुशील हगवणे हे अटक टाळण्यासाठी 17 मे ते 22 मे या पाच दिवसांत वेगवेगळ्या ठिकाणी लपून राहत होते. या काळात त्यांना आश्रय व मदत करणाऱ्या पाच जणांविरोधात पोलिसांनी कारवाई करत त्यांना अटक केली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर पुण्यातून पलायन केलेल्या या दोघांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यास या आरोपींनी मदत केली होती. आरोपींमध्ये माजी मंत्र्याच्या मुलाचाही समावेश मोहन उर्फ बंदू उत्तम भेगडे (वय 60, रा. वडगाव मावळ), बंदू लक्ष्मण फाटक (वय 55, रा. लोणावळा), अमोल विजय जाधव (वय 35, रा. पुसगाव, ता. खटाव, जि. सातारा), राहुल दशरथ जाधव (वय 45, रा. पुसगाव, ता. खटाव, जि. सातारा), प्रितम वीरकुमार पाटील (वय 47, रा. कोगनोळी, ता. चिकोडी, जि. बेळगाव, कर्नाटक) अशी आरोपींची नावे आहेत. प्रितम पाटील हे कर्नाटकातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री वीरकुमार पाटील यांचे सुपुत्र आहेत. वीरकुमार पाटील यांनी सलग 28 वर्षे आमदार राहिले असून, आपल्या कार्यकाळात ते ऊर्जा मंत्री देखील होते. मोहन भेगडे हा हगवणेंचा मित्र आहे. मोहन बंडू फाटक हा पवना डॅम जवळील फार्म हाऊसचा मालक आहे. अमोल जाधव आणि राहुल जाधव यांनी सातारा जिल्ह्यातील पुसेगावमध्ये हगवणे पिता पुत्रांना फार्म हाऊसवर आसरा दिला होता. तर प्रितम वीरकुमार पाटील याने कर्नाटकातील कोगनोळी या ठिकाणी हगवणे पिता पुत्रांना आसरा दिला होता.