नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंना मोठा धक्का:माजी आमदार आणि उपनेत्याने सोडली साथ, निर्मला गावीत यांचा शिंदे गटात प्रवेश

नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. इगतपुरीच्या माजी आमदार आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या निर्मला गावित यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत (शिंदे गट) जाहीर प्रवेश केला. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. तेव्हापासून उद्धव ठाकरेंच्या पक्षाला गळती लागल्याचे दिसून आले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश केला आहे. दोन दिवसांपूर्वीच नाशिकचे माजी आमदार नरेंद्र दराडे यांनी देखील उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र केला होता. त्यानंतर आज निर्मला गावीत यांच्या शिंदे गटातील प्रवेशाने उद्धव ठाकरेंच्या पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. माजी आमदार निर्मला रमेश गावित यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश केला. यावेळी गावित यांच्या सोबत नाशिक जिल्ह्यातील तब्बल हजारो महिला कार्यकर्त्याही शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. ठाणे येथे हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक, शिवसेना सचिव राम रेपाळे, शिवसेना उपनेते, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, शिवसेना प्रणित शिक्षक सेनेचे राज्य प्रमुख आमदार किशोर दराडे, आमदार नरेंद्र दराडे, माजी खासदार हेमंत गोडसे, माजी आमदार पांडुरंग गांगड, जिल्हाप्रमुख अनिल ढिकले, संपत काळे, सुरेश गंगापुत्र, सनी मेढे आदी पदाधिकारी उपस्थित होते. आता नेतृत्व बदलले, पण पक्ष तोच आमचे नेते बदलले आहेत, पण शिवसेना पक्ष तोच आहे. 2019 मध्ये मी एकनाथ शिंदेंच्याच मार्गदर्शनात शिवसेनेत प्रवेश केला होता. आता नेतृत्व बदलले आहे. पण पक्ष तोच आहे. मी लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शिवसेनेत सहभागी झाले असल्याचे निर्मला गावित यांनी म्हटले आहे. 2019 मध्ये काँग्रेसमधून शिवसेनेत दाखल निर्मला गावित या दिवंगत माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांच्या कन्या असून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेसमधून केली होती. त्या दोनदा इगतपुरीतून आमदार राहिल्या असून, 2019 मध्ये त्यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला होता. शिंदेंचे कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आवाहन दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आवाहन केले आहे. आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीत राज्यात शिवसेनेचा भगवा फडकेल. त्या दृष्टीने सगळीकडे वातावरण असल्याचे ते म्हणाले. महायुती म्हणून निवडणुकीची तयारी करणार आहोत, मात्र गरज पडल्यास शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष सक्षमपणे अन्य पर्यायांचा देखील विचार करेल, असे एकनाथ शिंदे म्हणाले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे, गाव तिथे शिवसेना आणि घर तिथे शिवसैनिक याप्रमाणे काम करण्याचे आवाहन एकनाथ शिंदे यांनी नाशिकमधील पदाधिकाऱ्यांना केले.